निषेध मोर्चातून जोडे मारो आंदोलन
खासदार सुनील तटकरे यांच्यावरील आरोपांचा तीव्र शब्दांत निषेध
राष्ट्रवादी भवन ते श्रीराम पूलदरम्यान महिलांची जोरदार घोषणाबाजी
आनंद सकपाळ | नेरळ:
शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता कर्जतमध्ये उमटू लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घातपातासंदर्भात तटकरे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांच्या निषेधार्थ कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) कर्जतमध्ये जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या छायाचित्राला जोडे मारो आंदोलन केले.

कर्जतमधील राष्ट्रवादी भवन येथून या निषेध मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर श्रीराम पुलापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान महिलांनी रामदास कदम यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे यावेळी दिसून आले. हातात निषेधाचे सूर आणि घोषणांच्या माध्यमातून महिलांनी आपला संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, रामदास कदम यांच्या छायाचित्राला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आल्याने या आंदोलनाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
या निषेध मोर्चाचे नेतृत्व कर्जत महिला तालुकाध्यक्षा रंजना धुळे, कर्जत पंचायत समितीच्या सभापती नमिता घारे, कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे आणि कर्जत-खालापूर विधानसभा महिला प्रमुख अश्विनी पाटील यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

रामदास कदम यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर कर्जत-खालापूरमधील राष्ट्रवादी महिला आघाडीने रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेतली आहे. या मोर्चाच्या माध्यमातून खासदार सुनील तटकरे यांच्या पाठीशी पक्षातील महिला संघटना ठामपणे उभी असल्याचा राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे रामदास कदम यांच्या वक्तव्यावरून रायगडमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.








