कन्या शाळेलगतची अनधिकृत हातगाडी थेट ट्रॅक्टरमध्ये
कर्जत नगरपरिषदेची अखेर धडक कारवाई
वरिष्ठांचे आदेश शिरसावंद्य मानत मुकादम निकेश फाळे यांची धाडसी भूमिका
प्रभारी मुख्याधिकारी, नगराध्यक्षा आणि नगर अभियंत्यांच्या आदेशाने कारवाई पूर्ण
रायगडचे वादळ न्यूज नेटवर्क | कर्जत:
कर्जत शहरातील कन्या शाळेच्या कुंपणाला अगदी खेटून सुरू असलेल्या अनधिकृत खाद्यपदार्थांच्या हातगाडीवर अखेर कर्जत नगरपरिषदेने धडक कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या हातगाडीचा विषय शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला होता. अखेर प्रभारी मुख्याधिकारी, नगराध्यक्षा सौ. पुष्पाताई दगडे आणि नगर अभियंता स्वागत बिरंबोळे यांच्या आदेशानंतर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित हातगाडी हटवली. विशेष म्हणजे, या कारवाईत नगरपरिषदेचे मुकादम निकेश फाळे यांनी दाखवलेली धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ भूमिका विशेष कौतुकास्पद ठरली आहे.
मागील दोन ते तीन दिवसांपासून कन्या शाळेच्या कुंपणाला लागूनच अनधिकृत हातगाडी सुरू असल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत साप्ताहिक रायगडचे वादळचे संपादक प्रभाकर गंगावणे यांनी छायाचित्रांसह तालुक्यातील विविध व्हॉट्सॲप समूहांवर हा प्रकार निदर्शनास आणून दिला होता. त्यानंतर नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी संबंधित हातगाडी चालकांना व्यवसाय बंद करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, विक्रीसाठी तयार केलेले खाद्यपदार्थ शिल्लक असल्याचे सांगितल्यानंतर कर्मचाऱ्यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून ते पदार्थ संपल्यानंतर हातगाडी बंद करण्याची समज दिली. त्यानुसार हातगाडी चालकांनी साहित्य आणि शाळेच्या कुंपणावर लावलेले जाहिरात बॅनर काढून घेतले होते.

मात्र, दोन दिवस उलटूनही प्रत्यक्ष हातगाडी हटवण्यात आली नव्हती. त्यामुळे नगरपरिषदेच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर ‘कर्जत नगरपरिषदेची कारवाई थंडावली’ या आशयाची बातमी साप्ताहिक रायगडचे वादळच्या ई-न्यूजमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. या वृत्तातून मुंबई उच्च न्यायालयाच्या १०० मीटरच्या निर्देशाचा, महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती आणि औद्योगिक वसाहती अधिनियम १९६५ तसेच भारत सरकारच्या राजपत्रातील तरतुदींचा संदर्भ देत प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष वेधण्यात आले होते.

दरम्यान, या हातगाडीवर कारवाई न करण्यासाठी नगरपरिषदेतील काही लोकप्रतिनिधींकडून दबाव टाकला जात असल्याची चर्चा शहरात रंगू लागली होती. मात्र, अखेर २१ नोव्हेंबर रोजी प्रभारी मुख्याधिकारी, नगराध्यक्षा सौ. पुष्पाताई दगडे आणि नगर अभियंता स्वागत बिरंबोळे यांनी संबंधित हातगाडी हटवण्याचे स्पष्ट आदेश दिले.
कारवाईदरम्यान अडथळे; मात्र निकेश फाळे डगमगले नाहीत
सुरुवातीला नगरपरिषदेचे बांधकाम लिपिक बापू बहिरम हे काही कर्मचाऱ्यांसह कारवाईसाठी घटनास्थळी गेले असता हातगाडी मालकाने कर्मचाऱ्यांशी वाद घालत धमकावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. त्यातच काही लोकप्रतिनिधींचे पाठबळ असल्याची चर्चा असल्याने कारवाईला अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र होते. त्यामुळे बापू बहिरम माघारी फिरण्याच्या तयारीत असतानाच नगर अभियंता स्वागत बिरंबोळे यांनी मुकादम निकेश फाळे यांना तातडीने घटनास्थळी जाऊन कारवाई पूर्ण करण्याचे आदेश दिले.

वरिष्ठांचा आदेश मिळताच निकेश फाळे यांनी कोणत्याही दबावाला किंवा विरोधाला न जुमानता नगरपरिषदेचे कर्मचारी आकाश परदेशी, दीपक परदेशी, शिवाजी सांबरी, अनिल चंदन, श्रीकांत वाघेला, परेश गरुडे आणि निरुद्दीन पठाण यांना सोबत घेत ट्रॅक्टरसह घटनास्थळी धाव घेतली.
त्यावेळी संबंधित हातगाडी मालक शेलार यांनी गोंधळ घालण्याचा आणि कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. मात्र, निकेश फाळे यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा देत नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुरुंगवासाचीही वेळ येऊ शकते, असे स्पष्ट शब्दांत बजावले. त्यांच्या ठाम भूमिकेमुळे अखेर हातगाडी मालक नरमले.
त्यानंतर निकेश फाळे, बापू बहिरम आणि नगरपरिषदेच्या इतर कर्मचाऱ्यांनी हातगाडी मालकाच्या उपस्थितीत संबंधित हातगाडीवरील साहित्य नियमानुसार काढून घेतले आणि संपूर्ण हातगाडी ट्रॅक्टरमध्ये भरून तेथून हटवली. अशा प्रकारे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकरणावर अखेर पडदा पडला.
निकेश फाळे यांची कर्तव्यनिष्ठा कौतुकास्पद
या संपूर्ण कारवाईत वरिष्ठांचे आदेश शिरसावंद्य मानून कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता निकेश फाळे यांनी दाखवलेली ठाम भूमिका विशेष लक्षवेधी ठरली. केवळ आदेश मिळवणे नव्हे, तर प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन विरोधाला सामोरे जात कारवाई पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. सरकारी कर्तव्य बजावताना कायद्यापुढे कुणीही मोठे नाही, हा संदेश त्यांच्या कृतीतून अधोरेखित झाला आहे.

त्यामुळे मुकादम निकेश फाळे यांच्यासह कारवाईत सहभागी झालेल्या सर्व कर्मचारी वर्गाचे, तसेच कारवाईचे आदेश देणाऱ्या प्रभारी मुख्याधिकारी, नगराध्यक्षा सौ. पुष्पाताई दगडे आणि नगर अभियंता स्वागत बिरंबोळे यांचे कर्जत शहरासह तालुक्यातून कौतुक होत आहे.
संपादक प्रभाकर गंगावणे यांची प्रतिक्रिया
“कन्या शाळेच्या कुंपणाला अगदी लागूनच सुरू असलेली अनधिकृत खाद्यपदार्थांची हातगाडी अखेर कर्जत नगरपरिषदेने हटवली, याचे मनापासून समाधान आहे. कायद्याचे पालन करत कर्तव्य बजावणाऱ्या प्रभारी मुख्याधिकारी, नगराध्यक्षा सौ. पुष्पाताई दगडे, नगर अभियंता स्वागत बिरंबोळे, मुकादम निकेश फाळे, बापू बहिरम आणि त्यांच्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!
विशेषतः निकेश फाळे यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता वरिष्ठांचे आदेश पाळत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कारवाई पूर्ण केली, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. आज कायदा पायदळी तुडवला गेला नाही, याचे समाधान आहे. मात्र, बेकायदेशीर कामांना खतपाणी घालणाऱ्या आणि अशा प्रकारांना पाठबळ देणाऱ्या लोकप्रतिनिधींचा आम्ही जाहीर निषेध करतो.
यापुढे पुन्हा या मार्गावर अशा प्रकारे अनधिकृत हातगाडी लागल्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवूच; परंतु गरज पडल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावून बेकायदेशीर हातगाड्यांना पाठबळ देणाऱ्यांनाही कायद्याचा धडा शिकवू!”
— प्रभाकर गंगावणे
संपादक, साप्ताहिक रायगडचे वादळ








