गोव्याहून मुख्य आरोपीला अटक
बेटिंग ॲपच्या ट्रेडिंगमधील कर्जबाजारीपणातून चोरीचा कट?
ओळखीच्या तरुणानेच घरात शिरून गळा आवळून केली हत्या
सोन्याचे दागिने खरेदी करणारा सोनारही पोलिसांच्या जाळ्यात
आनंद सकपाळ | कर्जत:
खोपोली शहरातील भानवज परिसरात ७१ वर्षीय महेश्वरी रामचंद्रन पन्नीकर या ज्येष्ठ महिलेची हत्या करून सोन्याचे दागिने लुटल्याच्या खळबळजनक घटनेचा उलगडा करण्यात खोपोली पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी यश मिनबहादूर थापा (वय २१) याला गोवा येथून पाठलाग करून पोलिसांनी ताब्यात घेतले, तर त्याने चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी काही दागिने खरेदी करणाऱ्या सोनारालाही पोलिसांनी अटक केली आहे. बेटिंग ॲपद्वारे ट्रेडिंग करताना झालेली आर्थिक कोंडी आणि कर्जबाजारीपणा या गुन्ह्यामागील संभाव्य कारण असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.

खोपोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार, ११ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ४.३३ वाजण्यापूर्वी भानवज येथील इंद्रप्रस्थ बिल्डिंगमधील खोली क्रमांक ४ मध्ये ही घटना घडली. फिर्यादी आनंद दामोधरन यांच्या बहीण महेश्वरी पन्नीकर या घरात एकट्याच असताना अज्ञात व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या हात-पायांना कपड्याने बांधून ओढणीच्या साहाय्याने गळा आवळला आणि डोके जमिनीवर आपटून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि हातातील तीन सोन्याच्या बांगड्या घेऊन आरोपी पसार झाला. याप्रकरणी त्याच दिवशी रात्री १०.५४ वाजता खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून संशयिताचा माग
ज्येष्ठ महिलेची हत्या आणि जबरी चोरी अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक आणि अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्त तपास सुरू केला. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
या तपासात घटनास्थळाजवळ राहणारा आणि मृत महिलेला ओळखणारा यश मिनबहादूर थापा याच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. त्याच्याबाबत अधिक माहिती घेतली असता तो बेटिंग ॲपद्वारे ट्रेडिंग करत असल्याचे आणि त्यामध्ये अनेकांकडून पैसे घेतल्याने कर्जबाजारी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विशेष म्हणजे, गुन्हा घडल्यानंतर तो आपल्या मित्रांसह गोव्याला फिरण्यासाठी गेल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
गोव्यातून पाठलाग करून मुख्य आरोपीला पकडले
संशयिताच्या हालचाली आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे खोपोली पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोव्यापर्यंत त्याचा माग काढला. तेथून पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांबाबत चौकशी केली असता त्यापैकी काही दागिने एका सोनाराला विकल्याची माहिती त्याने दिली. त्यानंतर तांत्रिक तपासातून संबंधित सोनाराचा या प्रकरणातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली.
कठोर शिक्षेसाठी रायगड पोलिसांकडून प्रयत्न
खोपोलीसारख्या शहरात ज्येष्ठ महिलेची घरात घुसून हत्या झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, खोपोली पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे अल्पावधीत गुन्ह्याचा उलगडा केल्याने नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास सार्थ ठरल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींविरोधात भक्कम पुरावे संकलित करण्याचे आणि त्यांना न्यायालयात कठोर शिक्षा मिळावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, खालापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल आणि राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक सचिन निकम, ज्ञानेश्वर एडवळे, अशोक जगताप तसेच खोपोली पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक आणि अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. खालापूर पोलीस ठाणे, अंगुलीमुद्रा विभाग आणि खोपोलीतील सीसीटीव्ही तज्ज्ञ गौरव शिंदे यांचेही तपासात सहकार्य लाभले.







