२५ नोव्हेंबरच्या संविधान सन्मान महासभेसाठी वंचित बहुजन आघाडीची जय्यत तयारी
जनसंपर्क कार्यालयात नियोजन बैठक उत्साहात संपन्न
रायगडचे वादळ न्युज नेटवर्क | कर्जत:
भारतीय संविधानाचा सन्मान, संवर्धन आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणाचा बुलंद आवाज मुंबईत घुमणार असून, या ऐतिहासिक संविधान सन्मान सभेसाठी कर्जत तालुका वंचित बहुजन आघाडी सज्ज झाला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे भव्य संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी जनसंपर्क कार्यालय, कर्जत येथे पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण नियोजन बैठक उत्साहात संपन्न झाली.
या बैठकीमध्ये कर्जत तालुक्यातील प्रत्येक गावातून संविधानप्रेमी, आंबेडकरी अनुयायांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले. सभेला जाण्यासाठी प्रवास व्यवस्था, गावागावात जनसंपर्क, प्रचार-प्रसार आणि विविध ठिकाणी बॅनर लावून संविधान सन्मान सभेची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
संविधान हे केवळ पुस्तक नसून ते प्रत्येक भारतीयाच्या स्वाभिमानाचे, अधिकारांचे आणि समानतेच्या हक्काचे प्रतीक आहे. संविधानाने दिलेली समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये जपण्यासाठी प्रत्येक संविधानप्रेमी नागरिकाने या सभेत सहभागी होणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा महासचिव धर्मेंद्र मोरे यांनी यावेळी व्यक्त केले.

या नियोजन बैठकीला जिल्हा महासचिव धर्मेंद्र मोरे, जिल्हा संघटक सुनील गायकवाड, तालुका अध्यक्ष प्रदीप ढोले, शहर अध्यक्ष लोकेश यादव, तालुका उपाध्यक्ष आनंद खैरे, जगदीश गायकवाड, कोषाध्यक्ष प्रदीप गायकवाड, महासचिव शैलेश खोब्रागडे, आयटी सेल प्रमुख प्रणेश यादव, उपाध्यक्ष सुनील मोरे, शरद गायकवाड, सहसचिव अनिकेत गायकवाड, आदेश जाधव, संघटक कमलाकर जाधव, सुनील वाघमारे, अशोक कदम, भारतीय बौद्ध महासभेचे अनंत गायकवाड, योगेश गायकवाड, विकी जाधव, अजय जाधव, संजय जाधव चंद्रकांत चाफे.यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चला, संविधानाच्या सन्मानासाठी एकत्र येऊया
कर्जत तालुक्यातील सर्व नागरिक, आंबेडकरी अनुयायी, युवक, महिला आणि संविधानप्रेमींनी बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे होणाऱ्या संविधान सन्मान सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधानिक चळवळीला बळ द्यावे, असे जाहीर आवाहन कर्जत तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.







