अभिनव ज्ञान मंदिरच्या विद्यार्थ्यांची रॅली
नृत्य, गीत आणि भाषणातून प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा संदेश
रायगडचे वादळ न्यूज नेटवर्क | कर्जत:
रेल्वे प्रवासादरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी तसेच प्रवाशांमध्ये रेल्वे सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष रेल्वे सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानात अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला, कर्जत येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रॅली, नृत्य, भाषणे आणि सामूहिक गीतांच्या माध्यमातून प्रवाशांना सुरक्षित रेल्वे प्रवासाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.

या उपक्रमाचे नेतृत्व कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण मतकर यांनी केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कड, गोपनीय शाखेचे अजय शिर्के तसेच रेल्वे पोलीस ठाण्याचा संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील एनसीसी, आरएसपी आणि गाईड विभागातील विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभाग नोंदविला. यावेळी गाईड कॅप्टन जयमाला जांभळे, एनसीसी प्रमुख बळीराम डोंगरे आणि आरएसपी प्रमुख अशोक तुपे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनी कुमारी तन्मय शेठ हिने प्रभावी भाषणातून रेल्वे सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले.
या जनजागृती अभियानाची सुरुवात अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेपासून करण्यात आली. शाळेपासून कर्जत रेल्वे स्थानकापर्यंत विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली. या रॅलीदरम्यान रेल्वे सुरक्षा, नियमांचे पालन आणि प्रवासातील खबरदारी याबाबत घोषणांच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले.

त्यानंतर कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर केले. तसेच एनसीसी, आरएसपी आणि गाईड विभागातील विद्यार्थ्यांनी सामूहिक गीतांच्या माध्यमातून प्रवाशांमध्ये रेल्वे सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण केली.
रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी अधिकृत पादचारी पूल किंवा भुयारी मार्गाचाच वापर करावा, रेल्वे लाईन क्रॉस करू नये, धावती रेल्वे पकडण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये, तसेच रेल्वे प्रवास करताना नेहमी सावधगिरी बाळगावी, असे महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांनी प्रवाशांना दिले.
रेल्वे अपघातांमागे अनेकदा प्रवाशांकडून नियमांचे होणारे उल्लंघन आणि निष्काळजीपणा कारणीभूत ठरतो. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाने स्वतःच्या सुरक्षिततेची जबाबदारी ओळखून रेल्वे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, हा संदेश या अभियानातून प्रभावीपणे देण्यात आला.

पोलीस प्रशासन आणि शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे रेल्वे सुरक्षेचा संदेश सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा वापर सामाजिक जनजागृतीसाठी केल्याने या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे. रेल्वे अपघात रोखण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासाची संस्कृती निर्माण करण्यासाठी असा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.







