तीन वाड्यांतील घरांना तडे, ६० वर्षीय महिलेसह १९ वर्षीय तरुण जखमी
तापकिरवाडी, मोरमारावाडा आणि धनगरवाडीतील ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली
वर्ष उलटूनही नुकसानभरपाई नाही, तीव्र ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांचा संताप
आनंद सकपाळ | नेरळ:
भिवपुरी कॅम्प येथील टाटा पंप स्टोरेज प्रकल्पाच्या कामासाठी करण्यात येणाऱ्या तीव्र ब्लास्टिंगचा फटका आता परिसरातील गावांना बसू लागला आहे. ब्लास्टिंगच्या जोरदार हादऱ्यांमुळे तापकिरवाडी, मोरमारावाडा आणि धनगरवाडी येथील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले असून, घरांवरील पत्रे आणि खिडक्यांच्या काचांचेही नुकसान होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. विशेष म्हणजे, या हादऱ्यांमुळे तापकिरवाडीतील ६० वर्षीय महिला आणि १९ वर्षीय तरुण जखमी झाल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या कामामुळे स्थानिकांच्या घरांच्या सुरक्षिततेसह जीविताचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. वर्ष उलटूनही काही बाधितांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

मोरमारावाडा येथे अवघ्या दहा घरांची वस्ती असून, या वस्तीतील घरांनाही ब्लास्टिंगच्या हादऱ्यांमुळे तडे गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथील दामू धोंडू मेठल (घर क्रमांक २२) आणि सुनिता दत्तू मोरमारे यांनी घरांच्या नुकसानीबाबत माहिती देताना सांगितले की, टाटा कंपनीच्या प्रतिनिधींनी यापूर्वी घरांची पाहणी करून नुकसानीचे छायाचित्रण केले होते. मात्र, या घटनेला वर्ष उलटूनही अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. दुसरीकडे, प्रकल्पस्थळी तीव्र ब्लास्टिंग सुरूच असल्याने घरांना बसणारे हादरे आणि भिंतींवरील तडे वाढत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

घरांना मोठ्या प्रमाणात तडे जात असताना आणि ब्लास्टिंगची तीव्रता कायम असताना कंपनीकडून ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. घरांची पडझड होऊन एखादी जीवितहानी झाल्यानंतरच कंपनी आणि प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवालही मोरमारावाड्यातील नागरिकांनी केला आहे. संबंधित घरांची सरपंच आणि उपसरपंच यांनीदेखील पाहणी केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान, तापकिरवाडीतील दोन घटनांमुळे परिस्थितीचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. येथील लत्ताबाई धोंडू नवले (वय ६०) यांच्या घरावरील पत्रा ब्लास्टिंगच्या हादऱ्यामुळे तुटून त्यांच्या डोक्यावर पडल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तब्बल दहा टाके घालावे लागले होते. ही घटना ताजी असतानाच दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यांच्याच घरातील कुणाल विलास नवले (वय १९) हा तरुण घरात अभ्यास करीत असताना ब्लास्टिंगच्या हादऱ्यामुळे खिडकीची काच फुटून त्याच्या हातात घुसली. त्यामुळे तोही जखमी झाला. एकाच घरात घडलेल्या या दोन घटनांमुळे तापकिरवाडीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी तहसीलदार, कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती बाधित कुटुंबातील हेमंत नवले यांनी दिली. तसेच या प्रश्नावर ग्रामस्थांची गावकीची बैठक घेऊन पुढील भूमिका ठरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

धनगरवाडीतील घरेदेखील टाटा पंप स्टोरेज प्रकल्पाच्या अगदी जवळ असल्याने तेथील ग्रामस्थांनाही ब्लास्टिंगच्या हादऱ्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. घरांच्या भिंतींना तडे जाणे, घरांना हादरे बसणे आणि ब्लास्टिंगच्या मोठ्या आवाजामुळे निर्माण होणारी भीती, अशा परिस्थितीत ग्रामस्थांना दैनंदिन जीवन जगावे लागत आहे. घरात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी असतानाही कोणत्याही क्षणी अनर्थ घडण्याची भीती नागरिकांना सतावत आहे.

एकीकडे मोठ्या क्षमतेचा पंप स्टोरेज प्रकल्प उभारण्याचे काम वेगाने सुरू असताना दुसरीकडे या प्रकल्पाच्या परिसरातील नागरिकांच्या घरांचे आणि जीविताचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कंपनीच्या प्रतिनिधींनी यापूर्वी पाहणी करूनही नुकसानभरपाईचा प्रश्न प्रलंबित असल्याच्या तक्रारी आणि ब्लास्टिंगमुळे नागरिक जखमी होण्याच्या घटना या गंभीर बाबी आहेत.

त्यामुळे तापकिरवाडी, मोरमारावाडा आणि धनगरवाडीतील सर्व बाधित घरांचे तातडीने स्वतंत्र तांत्रिक सर्वेक्षण करावे, ब्लास्टिंगची तीव्रता व जमिनीतील कंपनांची शास्त्रीय पद्धतीने नोंद घ्यावी, निर्धारित सुरक्षितता नियमांचे पालन होत आहे की नाही याची तपासणी करावी आणि नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. केवळ पाहणी आणि छायाचित्रणापुरती कारवाई न करता प्रत्यक्ष नुकसानभरपाई आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी देण्याची वेळ आता आली आहे. संभाव्य दुर्घटनेची वाट न पाहता टाटा कंपनी आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा बाधित ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.












