प्रमिला ताई बोराडे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला यश
कर्जत रेल्वे ब्रिजवरील खड्डे आणि साईडपट्ट्यांच्या दुरुस्तीला सुरुवात
उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन
रायगडचे वादळ न्यूज नेटवर्क | कर्जत:
कर्जत शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-अ वरील रेल्वे ब्रिजच्या रस्त्याची झालेली दुरवस्था, मोठमोठे खड्डे, खचलेल्या साईडपट्ट्या आणि परिसरातील अस्वच्छता यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. अखेर या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली असून, खड्डे बुजविणे आणि साईडपट्ट्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या महिला पदाधिकारी तथा हालिवली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. प्रमिला ताई सुरेश बोराडे यांनी या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन रेल्वे ब्रिजवरील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. रस्त्यावरील खड्डे बुजविणे, दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्यांची दुरुस्ती करणे, परिसरातील काटेरी झुडपे हटविणे आणि स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली होती.
विशेष म्हणजे, मार्च २०२६ मध्येही याच समस्येबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी साईडपट्ट्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले; मात्र हे काम अर्धवटच सोडण्यात आल्याने नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या मार्गावरून दररोज विद्यार्थी, नोकरदार, दुचाकीस्वार, रिक्षा तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. शनिवार आणि रविवारच्या दिवशी होणाऱ्या वाहतूक कोंडीदरम्यान वाहनचालकांना साईडपट्ट्यांचा आधार घ्यावा लागतो. अशा परिस्थितीत खड्डे आणि खचलेल्या साईडपट्ट्यांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
प्रशासनाला दिले होते निवेदन; आंदोलनाचा दिला होता इशारा
या समस्येबाबत सौ.प्रमिला ताई सुरेश बोराडे मा.कर्जत खालापूर विधानसभा संघटक तथा मा.सरपंच ग्रामपंचायत हालिवली यांनी कर्जत पंचायत समितीच्या उपसभापती सौ. चित्रा ताई जगदीश ठाकरे, सौ. मंदाताई हाडप, सौ. दर्शना ताई भोईर, सुरेश बोराडे आणि अशोक भोईर आदींच्या उपस्थितीत संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर केले होते. यावेळी नायब तहसीलदार मृणाली शिरसाट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच कर्जत पोलीस ठाण्यातही निवेदन देऊन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती.

प्रशासनाने आठवडाभरात दुरुस्तीच्या कामाला सुरुवात न केल्यास सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रेल्वे ब्रिजवरील खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रमिला ताई बोराडे यांनी दिला होता. तसेच निधीची कमतरता असल्यास शिवसेनेच्या वतीने ‘भीक मागो’ आंदोलन करून निधी उपलब्ध करून देण्याचा उपरोधिक इशाराही देण्यात आला होता.
चारफाटा येथे उद्धवसेनेचे आंदोलन; पदाधिकारी रस्त्यावर उतरले
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते चारफाटा येथे एकत्र आले. त्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात काही काळ आंदोलन करून संबंधित विभागाच्या कारभाराचा निषेध केला. यावेळी रस्त्यावरील खड्डे केवळ वरवर न भरता ते दर्जेदार पद्धतीने आणि व्यवस्थित बुजविण्यात यावेत, तसेच साईडपट्ट्यांचीही योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली.
या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख बजरंग दळवी, माधव कोळंबे, माजी सभापती प्रदीप ठाकरे, पंचायत समितीच्या उपसभापती चित्रा ठाकरे, पंचायत समिती सदस्या नमिता श्रीखंडे, नगरसेविका सुचिता खोत, माजी सरपंच प्रमिला ताई बोराडे, मिनाताई कुलकर्णी, विमलताई दिसले, लहु श्रीखंडे, रामदास घरत, ॲड. संपत हाडप, शाम पवाळी, सुरेश बोराडे, प्रशांत शहा, आकाश जाधव, महेश लोट, रवींद्र मोधळे आणि सतीश पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन; आंदोलन स्थगित
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने या प्रकरणी लेखी पत्र देण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-अ (शहापूर-मुरबाड-म्हसा-कर्जत-खोपोली) हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग, पेण यांच्याकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे प्रशासनाने पत्रात नमूद केले आहे.
मात्र, रस्त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असली तरी वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने कर्जत रेल्वे पुलाजवळील खराब झालेल्या रस्त्याची तातडीने पाहणी करण्यात येईल. तसेच रस्त्याच्या साईडपट्ट्यांची आवश्यक दुरुस्ती, परिसराची स्वच्छता आणि रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे हाती घेऊन वाहतूक सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्राधान्याने करण्यात येतील, असे आश्वासन उपकार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी प्रमिला ताई बोराडे यांना लेखी पत्राद्वारे दिली होती.
तसेच १६ नोव्हेंबर रोजी प्रस्तावित असलेले आंदोलन स्थगित करून प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर रस्ते विकास महामंडळ, पेण येथील शाखा अभियंता राहुल विशे यांनी खड्डे आणि साईडपट्ट्यांच्या दुरुस्तीचे काम दुसऱ्या दिवसापासून सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.
आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे नागरिकांच्या प्रश्नाला न्याय
कर्जत रेल्वे ब्रिजवरील रस्त्याची दुरवस्था हा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. वारंवार निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने अखेर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे लेखी आश्वासन दिले आणि प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली, ही समाधानाची बाब आहे.
मात्र, केवळ खड्डे बुजविण्यापुरतीच कार्यवाही मर्यादित न ठेवता साईडपट्ट्यांची दर्जेदार दुरुस्ती, परिसराची स्वच्छता आणि भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. संबंधित विभागाने दिलेल्या आश्वासनाची पूर्ण अंमलबजावणी करून कामाचा दर्जा राखावा, अशी अपेक्षा कर्जतकर नागरिकांकडून व्यक्त होत आहे.







