उद्या जनजागृती मोहीम अन् भव्य कॅण्डल मार्च
३९, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व संघटनांचा सहभाग
दिगंबर चंदने | कर्जत:
कर्जत तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांग, नैसर्गिक जंगलसंपत्ती, जलस्रोत आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आता कर्जतमध्ये व्यापक जनआंदोलन उभे राहत आहे. टोरेंट, पोशिर आणि शिलार येथील प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी तसेच टोरेंट कंपनीकडून दसऱ्याच्या दिवशी करण्यात आलेल्या वृक्षतोडीचा निषेध करण्यासाठी कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समितीच्या वतीने रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी कर्जत शहरात भव्य जनजागृती मोहीम आणि कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटना, पत्रकार संघटना आणि स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून तब्बल ३९ संस्था व संघटना या मोहिमेत सहभागी होणार आहेत.
कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या विविध प्रकल्पांमुळे सह्याद्री पर्वतरांगांचे अस्तित्व, घनदाट जंगल, वन्यजीव, नैसर्गिक जलस्रोत आणि स्थानिक नागरिकांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गसंपत्तीचा ऱ्हास होऊ नये, भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरणाचे संतुलन टिकून राहावे आणि स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, या प्रमुख उद्देशाने संघर्ष समितीने जनजागृती आणि आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
सकाळी सह्याद्री संरक्षणासाठी जनजागृती मोहीम
रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कर्जत येथील पोस्ट ऑफिसजवळ सह्याद्री संरक्षण जनजागृती व सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून टोरेंट, पोशिर आणि शिलार येथील प्रस्तावित प्रकल्पांचे संभाव्य पर्यावरणीय परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून हे प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीला जनसमर्थन मिळविण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे.

सायंकाळी कॅण्डल मार्चमधून पर्यावरण रक्षणाचा संदेश
जनजागृती मोहिमेनंतर सायंकाळी ५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे. सह्याद्रीचे संरक्षण, जंगलसंपत्तीची जपणूक, जलस्रोतांचे संवर्धन आणि स्थानिक नागरिकांच्या हक्कांसाठी एकजुटीचा संदेश या कॅण्डल मार्चमधून दिला जाणार आहे. तसेच टोरेंट कंपनीकडून दसऱ्याच्या दिवशी करण्यात आलेल्या वृक्षतोडीचा निषेधही यावेळी नोंदविण्यात येणार आहे.
३९ राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि संघटनांचा सहभाग
या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कर्जत तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, कामगार संघटना, शेतकरी संघटना, पत्रकार संघटना आणि पर्यावरणप्रेमी संघटना एकाच व्यासपीठावर येत आहेत.
या जनजागृती मोहिमेत आणि कॅण्डल मार्चमध्ये कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समिती, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), वंचित बहुजन आघाडी, आधार जनसेवा सामाजिक संस्था, जागृत कष्टकरी संघटना, भारतीय बौद्ध महासभा, कर्जत रेल्वे पॅसेंजर हक्क समिती, कर्जत शहर बचाव समिती, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, चलो साथी क्रांती करे, कर्जत तालुका सकल मराठा समाज, किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य, ॲन्टी करप्शन बोर्ड रायगड, कर्जत प्रेस क्लब, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), शिलार धरण विरोधी संघर्ष समिती, पोशिर धरण शेतकरी संघटना, शिवसंग्राम (विनायक मेटे) रायगड जिल्हा, पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत, बाळदिगंबर रिक्षा चालक-मालक संघटना, आगरी समाज संघटना कर्जत, शेतकरी कामगार पक्ष, आझाद समाज पार्टी, ग्राम संघर्ष समिती पाली तर्फे कोथळखलाटी, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ कर्जत-रायगड, ऑल इंडिया पँथर सेना कर्जत-रायगड, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ कर्जत तालुका, सह्याद्री आदिवासी समाज संघटना कर्जत-रायगड, साप्ताहिक रायगडचे वादळ, कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन, कर्जत प्रेस असोसिएशन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट), आधार असंघटित जनरल कामगार युनियन आणि क्षत्रिय मराठा समाज माथेरान या ३९ संस्था व संघटना सहभागी होणार आहेत.
सह्याद्रीच्या अस्तित्वासाठी नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन
सह्याद्री पर्वतरांग ही केवळ डोंगररांग नसून ती कर्जत तालुक्याची नैसर्गिक संपत्ती, जैवविविधतेचा आधार आणि असंख्य नागरिकांच्या जीवनाशी निगडित असलेली महत्त्वपूर्ण पर्यावरणीय व्यवस्था आहे. जंगलांचे संवर्धन, पाण्याचे स्रोत टिकविणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास होऊ नये, यासाठी नागरिकांनी जागरूक होऊन एकत्रितपणे आवाज उठविण्याची आवश्यकता असल्याचे संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात येत आहे.
या जनजागृती मोहिमेत आणि कॅण्डल मार्चमध्ये कर्जत तालुक्यातील सर्व नागरिक, पर्यावरणप्रेमी, युवक, महिला, शेतकरी आणि विविध सामाजिक घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समितीचे सह्याद्री संरक्षक ॲड. कैलास मोरे यांनी केले आहे.
सह्याद्री वाचला तरच निसर्ग वाचेल आणि निसर्ग वाचला तरच भविष्यातील पिढ्यांचे अस्तित्व सुरक्षित राहील, हा संदेश घेऊन उद्या कर्जतच्या रस्त्यावर पर्यावरण रक्षणाचा आवाज घुमणार आहे.







