१२ रिक्षा चालकांचा एल्गार
‘एक रिक्षा, एक चालक’चा समान नियम लागू करण्याची मागणी
अन्यथा २ डिसेंबरपासून सहपरिवार आमरण उपोषणाचा इशारा
आनंद सकपाळ | नेरळ:
माथेरानमधील ई रिक्षा सेवेच्या व्यवस्थापनावरून आता चालकांमधील असंतोष उफाळून आला आहे. खासगी ई रिक्षा चालकांसाठी ‘एक रिक्षा, एक चालक’ असा नियम लागू असताना नगरपालिकेच्या सहा ई रिक्षांवर मात्र १२ चालकांची नियुक्ती करण्यात आल्याने प्रशासनाकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप संबंधित चालकांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ६ ऑगस्ट २०२५ रोजीच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या कथित अन्यायाविरोधात १२ चालकांनी मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना लेखी निवेदन देत २ डिसेंबरपासून सहपरिवार आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

माथेरानमध्ये ई रिक्षा सेवा सुरू झाली, त्यावेळी २० चालकांनी स्वतःच्या मालकीच्या ई रिक्षा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याचवेळी अन्य १२ चालकांना नगरपालिकेच्या ताफ्यातील जुन्या सहा ई रिक्षा केवळ एका महिन्याच्या मुदतीसाठी चालविण्यास देण्यात आल्या होत्या. मात्र, महिनाभरासाठी करण्यात आलेली ही व्यवस्था तब्बल सात महिने उलटूनही कायम असल्याने संबंधित चालकांमध्ये नाराजी वाढली आहे. तात्पुरत्या स्वरूपात दिलेल्या जबाबदारीचे कायमस्वरूपी व्यवस्थेत रूपांतर झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, प्रशासनाकडून या प्रश्नावर कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याची त्यांची तक्रार आहे.
खासगी चालकांना एक रिक्षा, तर पालिकेच्या रिक्षांवर दोन चालक
खासगी मालकीच्या २० ई रिक्षांसाठी एक रिक्षा आणि एक चालक असा निकष निश्चित करण्यात आला आहे. मात्र, नगरपालिकेच्या सहा ई रिक्षांसाठी प्रत्येकी दोन चालकांची नियुक्ती करण्यात आल्याने कामाच्या संधी आणि उत्पन्नाच्या बाबतीत असमानता निर्माण होत असल्याचे १२ चालकांचे म्हणणे आहे. सर्व चालकांसाठी समान नियम असताना नगरपालिकेच्या रिक्षा चालविणाऱ्या चालकांनाच वेगळा निकष का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे, आम्ही आदिवासी, वंचित आणि मागासवर्गीय समाजातील असल्यामुळेच आमच्याबाबत प्रशासनाकडून दुजाभाव केला जात आहे का, असा गंभीर प्रश्नही या चालकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ ई रिक्षांच्या व्यवस्थापनापुरता मर्यादित न राहता समान संधी आणि न्याय्य वागणुकीशी जोडला गेला आहे.
जुन्या रिक्षांचा दुरुस्ती खर्चही चालकांच्याच माथी
नगरपालिकेकडून देण्यात आलेल्या सहा ई रिक्षा जुन्या आणि जीर्ण अवस्थेतील असल्याने त्या वारंवार नादुरुस्त होत असल्याची तक्रार चालकांनी केली आहे. रिक्षा बंद पडल्याने प्रवासी वाहतुकीवर परिणाम होतोच, शिवाय दुरुस्तीचा आर्थिक भारही चालकांनाच सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. एकीकडे खासगी रिक्षा चालकांना स्वतंत्रपणे व्यवसाय करण्याची संधी मिळत असताना दुसरीकडे पालिकेच्या जुन्या रिक्षांवर अवलंबून असलेल्या चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

प्रशासनाने सर्व चालकांसाठी ‘एक रिक्षा, एक चालक’ हा समान निकष लागू करावा, जुन्या रिक्षांच्या दुरुस्तीची जबाबदारी निश्चित करावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ती कार्यवाही करावी, अशा प्रमुख मागण्या या १२ चालकांनी केल्या आहेत. या मागण्यांवर २ डिसेंबरपूर्वी सकारात्मक निर्णय न झाल्यास सहकुटुंब आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
आता १२ ई रिक्षा चालकांनी दिलेल्या या अल्टिमेटमनंतर माथेरान नगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते, सात महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर समान न्याय देणारा तोडगा काढते का आणि संभाव्य उपोषण टाळण्यासाठी पुढाकार घेते का, याकडे माथेरानकरांचे लक्ष लागले आहे.






