राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संस्था व संघटनांची एकजूट
एकूण ३२ संघटना टोरेंट, पोशीर, शिलार प्रकल्पांविरोधात एकवटल्या
वृक्षतोडीच्या निषेधार्थ सह्यांची मोहीम अन् कँडल मार्च
रायगडचे वादळ न्यूज नेटवर्क | कर्जत:
टोरेंट, पोशीर आणि शिलार हे प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी तसेच टोरेंट कंपनीने दसऱ्याच्या दिवशी केलेल्या वृक्षतोडीचा निषेध नोंदविण्यासाठी कर्जत तालुक्यात पर्यावरण रक्षणाच्या लढ्याने आता व्यापक स्वरूप धारण केले आहे. या प्रकल्पांविरोधात जनजागृती करण्यासाठी रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी कर्जत येथे विशेष जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटना आणि स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दर्शविला असून तब्बल ३२ पक्ष आणि संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
या अभियानांतर्गत रविवार, २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कर्जत पोस्ट ऑफिसजवळ सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे टोरेंट, पोशीर आणि शिलार प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीला नागरिकांचा व्यापक पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता कँडल मार्च काढून वृक्षतोडीचा निषेध आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला जाणार आहे.

टोरेंट कंपनीने दसऱ्याच्या दिवशी केलेल्या वृक्षतोडीच्या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाची हानी होऊ नये, स्थानिक पर्यावरणाचे संरक्षण व्हावे आणि परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्ती अबाधित राहावी, या भूमिकेतून या प्रकल्पांना विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर केवळ एका संघटनेपुरता मर्यादित न राहता विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे या जनजागृती अभियानाला विविध राजकीय पक्षांसह सामाजिक, कामगार, शेतकरी, आदिवासी, पत्रकार, रेल्वे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असलेल्या संघटनांनीही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील पर्यावरण रक्षणाच्या या लढ्याला व्यापक जनसमर्थन मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
या अभियानाला पाठिंबा देणाऱ्या संघटनांमध्ये कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समिती, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), शेतकरी कामगार पक्ष आणि आझाद समाज पार्टी या राजकीय पक्षांचा समावेश आहे.
त्याचबरोबर आधार जनसेवा सामाजिक संस्था, जागृत कष्टकरी संघटना, भारतीय बौद्ध महासभा, कर्जत रेल्वे पॅसेंजर हक्क समिती, कर्जत शहर बचाव समिती, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, चलो साथी क्रांती करे, कर्जत तालुका सकल मराठा समाज, किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य, ॲंटी करप्शन बोर्ड रायगड, कर्जत प्रेस क्लब, शिलार धरण विरोधी संघर्ष समिती, पोशीर धरण शेतकरी संघटना, शिव संग्राम (विनायक मेटे) रायगड जिल्हा, पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत, बाळदिगंबर रिक्षाचालक-मालक संघटना, आगरी समाज संघटना कर्जत, ग्राम संघर्ष समिती पाली तर्फे कोथळखलाटी, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ कर्जत-रायगड, ऑल इंडिया पँथर सेना कर्जत-रायगड, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ कर्जत तालुका, सह्याद्री आदिवासी समाज संघटना कर्जत-रायगड, साप्ताहिक रायगडचे वादळ आणि कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन या संघटनांनीही अभियानाला पाठिंबा दर्शविला आहे.
या सर्व संघटनांचे प्रतिनिधी सह्यांची मोहीम आणि कँडल मार्चमध्ये सहभागी होऊन प्रकल्पांविरोधातील आपली भूमिका मांडणार आहेत. पर्यावरणाचे रक्षण, वृक्षतोडीला विरोध आणि स्थानिक नागरिकांच्या हिताचे संरक्षण या प्रमुख मुद्द्यांवर नागरिकांना एकत्र आणण्याचा या अभियानाचा उद्देश आहे.
पर्यावरणाच्या प्रश्नावर पक्षीय मतभेद बाजूला ठेवून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि संघटनांनी एकत्र येणे ही या अभियानाची महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे. त्यामुळे रविवारच्या या जनजागृती अभियानाकडे संपूर्ण कर्जत तालुक्याचे लक्ष लागले असून पर्यावरण रक्षणाच्या या लढ्याला नागरिकांचा किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
टोरेंट, पोशीर आणि शिलार प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी तसेच निसर्ग आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या सह्यांच्या मोहिमेत आणि कँडल मार्चमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.







