कॅन्सलेशन चार्जेसमधून प्रवाशांना दिलासा
गाडी सुटण्याच्या २४ तास आधी अर्ज आवश्यक
कुटुंबीयांसह विशेष गटांसाठीही तिकीट हस्तांतरणाची सुविधा
दिगंबर चंदने | कर्जत, रायगड:
रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. अनेकदा ऐनवेळी काही कारणांमुळे नियोजित रेल्वे प्रवास रद्द करावा लागतो. अशावेळी कन्फर्म तिकीट रद्द केल्यामुळे प्रवाशांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. मात्र, भारतीय रेल्वेच्या नियमानुसार आता ठराविक अटींच्या अधीन राहून कन्फर्म तिकीट दुसऱ्या पात्र व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित करता येते. त्यामुळे तिकीट रद्द करण्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीला त्याच तिकिटावर प्रवास करता येऊ शकतो.
रेल्वेच्या नियमानुसार आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पती आणि पत्नी यांच्या नावावर कन्फर्म तिकीट हस्तांतरित करता येते. यासाठी गाडी सुटण्याच्या किमान २४ तास आधी संबंधित रेल्वे स्थानकातील आरक्षण कार्यालयात लेखी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासोबत मूळ आणि नवीन प्रवासी या दोघांचीही वैध ओळखपत्रे सादर करावी लागतात.
याशिवाय शैक्षणिक सहलीतील विद्यार्थ्यांसाठी, लग्नाच्या वऱ्हाडासाठी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या अधिकृत प्रवासासाठीही विशेष तरतूद आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित संस्थाप्रमुख किंवा सक्षम अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीसह साधारणतः ४८ तास आधी अर्ज करणे आवश्यक आहे. एनसीसी कॅडेट्ससाठी प्रभारी अधिकाऱ्यामार्फत २४ तास आधी अर्ज करण्याची तरतूद आहे.
मात्र, तिकीट हस्तांतरणासाठी रेल्वेने निश्चित केलेल्या अटी, कालमर्यादा आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. त्यामुळे ऐनवेळी प्रवास रद्द करावा लागणाऱ्या प्रवाशांनी तिकीट कॅन्सल करण्यापूर्वी या सुविधेची माहिती घेऊन संबंधित आरक्षण कार्यालयाशी संपर्क साधावा.








