रिक्षा थांबे आणि पार्किंग नियोजनासाठी नगरपरिषद-पोलिसांची संयुक्त बैठक
वाहतुकीला अडथळा ठरणारी ठिकाणे निश्चित करणार
रिक्षा थांबे आणि वाहनतळांची प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजनांची आखणी
शहानवाज मुकादम | रोहा:
रोहा शहरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील वाहनांची गर्दी तसेच अनियोजित रिक्षा थांबे आणि पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी रोहा अष्टमी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सुरळीत करण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शहरातील वाहतूक कोंडीची कारणे, रिक्षा थांब्यांचे नियोजन, वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतूक समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.

रोहा शहराची वाढती लोकसंख्या, दिवसेंदिवस वाढणारी दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या आणि शहरातील मर्यादित रस्ते यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत आहे. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी रिक्षांची अनियंत्रित वर्दळ, रस्त्याच्या कडेला होणारे वाहनांचे पार्किंग आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या ठिकाणांमुळे नागरिकांना अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने बैठकीत महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित करण्यात आले.
रिक्षा थांब्यांचे होणार नियोजन
शहरातील विविध रिक्षा थांब्यांवर क्षमतेपेक्षा अधिक रिक्षा उभ्या राहत असल्यास त्याचा परिणाम वाहतुकीवर होत असल्याची बाब लक्षात घेऊन प्रत्येक रिक्षा थांब्यावर नेमक्या किती रिक्षांना थांबण्याची परवानगी द्यावी, यावर चर्चा करण्यात आली. तसेच थांब्यांवर जागा उपलब्ध नसलेल्या उर्वरित रिक्षांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
वाहन पार्किंगसाठी स्वतंत्र जागा निश्चित करणार
शहरातील नागरिक तसेच बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना वाहन पार्किंगसाठी योग्य जागा उपलब्ध व्हावी, यासाठी नियोजित पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात आला. रस्त्याच्या कडेला होणारे अनधिकृत पार्किंग कमी करून वाहतुकीचा मार्ग मोकळा ठेवण्यासाठी उपलब्ध जागांचा शोध घेण्याबाबतही चर्चा झाली.
वाहतुकीला अडथळा ठरणारी ठिकाणे निश्चित करणार
शहरातील ज्या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होते, अशा ठिकाणांची निश्चिती करून त्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बाबींचा अभ्यास करून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
संयुक्त पाहणीनंतर ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी
बैठकीत झालेल्या चर्चेनंतर पुढील टप्प्यात नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाकडून शहरातील संभाव्य रिक्षा थांबे, वाहतूक कोंडीची ठिकाणे आणि वाहन पार्किंगसाठी उपलब्ध असलेल्या जागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. या पाहणीनंतर पोलीस प्रशासन, जिल्हा वाहतूक शाखा, रिक्षा संघटना आणि नगरपरिषद यांच्या समन्वयातून आवश्यक त्या उपाययोजना निश्चित करून त्यांची अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारताना रिक्षाचालकांचे प्रश्न, व्यापाऱ्यांच्या अडचणी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा यांचाही विचार केला जाणार आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासोबतच पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी, यासाठी नियोजन करण्यावर भर राहणार आहे.
दरम्यान, रोहा शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न केवळ तात्पुरत्या उपाययोजनांनी सुटणारा नसून त्यासाठी योग्य नियोजन, प्रशासनातील समन्वय आणि नियमांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यामुळे या बैठकीनंतर होणाऱ्या संयुक्त पाहणीकडे आणि प्रत्यक्ष उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडे आता रोहेकरांचे लक्ष लागले आहे.
या बैठकीस नगराध्यक्षा वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, सभापती नीता हजारे, गटनेते महेंद्र गुजर, नगरसेविका पूर्वा मोहिते, संजना शिंदे, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय शेलार, नगरपरिषदेचे पदाधिकारी व अधिकारी तसेच विविध रिक्षा संघटनांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.








