लोकल पकडण्यासाठी रुळ ओलांडण्याचा धोकादायक प्रकार
श्रीकांत खुपेरकर | डोंबिवली:
कोपर रेल्वे स्थानकात सकाळी ७.५५ वाजण्याच्या सुमारास डहाणू-पनवेल मेमू गाडी फलाट क्रमांक चारवर येताच प्रवाशांची जीवघेणी धावपळ सुरू होते. हा प्रतिनिधी फलाट क्रमांक तीनवर उभा असताना अनेक प्रवासी गाडी पूर्णपणे थांबण्यापूर्वीच खाली उतरून सीएसएमटी किंवा कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल पकडण्यासाठी रुळ ओलांडून फलाट क्रमांक तीनवर येताना दिसले.

या प्रकारात लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या अनेक कुटुंबांचाही समावेश होता. रेल्वेने केलेले कुंपण असूनही काही प्रवासी त्यावरून उड्या मारून, तर काही कुंपणातील मोकळ्या जागेतून फलाट क्रमांक तीनवर येत होते. स्थानकात पादचारी पूल उपलब्ध असतानाही मोजकेच प्रवासी त्याचा वापर करतात. बहुतांश प्रवासी वेळ वाचवण्यासाठी थेट रेल्वे रुळ ओलांडण्याचा धोकादायक मार्ग स्वीकारतात.
अशा वेळी पनवेलच्या दिशेने मालगाडी किंवा मेल-एक्स्प्रेस आली तर काय होईल? रुळ ओलांडणारे प्रवासी कुठे जाणार? स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या जीवाचीही पर्वा न करता प्रवासी हा धोका पत्करत आहेत. मध्य रेल्वे प्रशासन एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या मार्गावर रेल्वे सेवा सुरू झाल्यापासून हा प्रकार सुरू आहे. पनवेल, दिवा, वसई आणि डहाणू मार्गावरील गाड्यांची अपुरी संख्या हे त्यामागील प्रमुख कारण आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून मेमू गाड्या चालवल्या जात असल्या तरी पनवेल ते डहाणू तसेच दिवा-वसई-दिवा मार्गावर नियमित ईएमयू लोकल सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे.
सकाळी ७.५५ वाजता डहाणू-पनवेल मेमू कोपरला येते. त्यानंतर थेट सकाळी १०.३० वाजता बोईसर-दिवा मेमू येते. म्हणजेच या दोन गाड्यांमध्ये तब्बल दोन तास ३५ मिनिटांचे अंतर आहे.

त्याचप्रमाणे सकाळी ५.५० वाजता डोंबिवली-बोईसर मेमू सुटल्यानंतर पुढील पनवेल-वसई गाडी कोपरला सकाळी १०.२० वाजता येते. त्यामुळे जवळपास साडेचार तासांचा खंड पडतो. सकाळच्या गर्दीच्या वेळेतही गाड्यांमध्ये इतके मोठे अंतर असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. संध्याकाळीही अशीच परिस्थिती आहे.

या मार्गावरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना गाड्यांची संख्या मात्र अपुरी आहे. भिवंडीचे खासदार बाळू मामा म्हात्रे यांनी या गंभीर प्रश्नात लक्ष घालून रेल्वेमंत्री आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडे नियमित ईएमयू लोकल सुरू करण्यासाठी तसेच गाड्यांची वारंवारता वाढवण्यासाठी पाठपुरावा करावा.
हा मार्ग मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा सोयीचा पर्याय आहे. दादरमार्गे प्रवास करण्याऐवजी या मार्गाने प्रवाशांचा वेळ आणि पैसाही वाचतो.
कोपर स्थानकात प्रत्यक्ष पाहिलेल्या या धोकादायक प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.







