मशाल नव्हे, हातात कॅण्डल घेऊन संघर्षाचा निर्धार
टोरंट, पोशिर आणि शिलार प्रकल्पांना विरोध
वृक्षतोडीच्या निषेधार्थ जनजागृती मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
३२ राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व संघटनांचा सहभाग
आनंद सकपाळ | नेरळ:
सह्याद्री पर्वतरांगांचे संरक्षण, जंगलसंपत्तीची जपणूक, नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन आणि स्थानिक नागरिकांच्या हक्कांसाठी कर्जतमध्ये रविवारी (२२ नोव्हेंबर) व्यापक जनजागृती मोहीम आणि कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले. टोरंट कंपनीच्या सायडोंगर प्रकल्पासह पोशिर आणि शिलार प्रकल्पांना विरोध दर्शवित तसेच दसऱ्याच्या दिवशी सायडोंगर परिसरात झालेल्या वृक्षतोडीचा निषेध करण्यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटना आणि पर्यावरणप्रेमी एकवटले. तब्बल ३२ राजकीय व सामाजिक संघटनांनी या उपक्रमाला पाठिंबा देत सहभाग नोंदविला. त्यामुळे सह्याद्री संरक्षणाचा मुद्दा आता एका संघटनेपुरता मर्यादित न राहता व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप धारण करू लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कर्जत येथील पोस्ट ऑफिसजवळ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सह्याद्री संरक्षण जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या माध्यमातून सह्याद्री पर्वतरांगांचे पर्यावरणीय महत्त्व, जंगलतोडीचे संभाव्य परिणाम, जलस्रोतांवरील संकट आणि प्रस्तावित प्रकल्पांमुळे स्थानिक नागरिकांच्या जीवनावर होणारे परिणाम याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. टोरंट, पोशिर आणि शिलार प्रकल्पांबाबत स्थानिक जनतेच्या भावना आणि आक्षेप शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

सायंकाळी ५.३० वाजता कॅण्डल मार्चला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर डेक्कन जिमखाना येथून कॅण्डल मार्चला प्रारंभ करण्यात आला. तेथून कर्जत रेल्वे स्थानक परिसरातील जकात नाका मार्गे टिळक चौक येथे मार्च पोहोचला. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून कॅण्डल मार्चची सांगता करण्यात आली. हातात प्रज्वलित मेणबत्त्या घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी सह्याद्रीच्या संरक्षणाचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
३२ संघटनांची एकजूट; राजकीय मतभेद बाजूला ठेवून सह्याद्रीसाठी एकत्र
या जनजागृती मोहिमेत कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समितीसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष), वंचित बहुजन आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि आजाद समाज पार्टी अशा विविध राजकीय पक्षांनी सहभाग घेतला.
याशिवाय आधार जनसेवा सामाजिक संस्था, जागृत कष्टकरी संघटना, भारतीय बौद्ध महासभा, कर्जत रेल्वे पॅसेंजर हक्क समिती, कर्जत शहर बचाव समिती, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, चलो साथी क्रांती करे, कर्जत तालुका सकल मराठा समाज, किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य, अॅन्टी करप्शन बोर्ड रायगड, कर्जत प्रेस क्लब, शिलार धरण विरोधी संघर्ष समिती, पोशिर धरण शेतकरी संघटना, शिवसंग्राम रायगड जिल्हा, पोलीस मित्र संघटना, बाळदिगंबर रिक्षा चालक-मालक संघटना, आगरी समाज संघटना कर्जत, ग्राम संघर्ष समिती पाली तर्फे कोथळखलाटी, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ, ऑल इंडिया पँथर सेना, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, सह्याद्री आदिवासी समाज संघटना, साप्ताहिक रायगडचे वादळ आणि कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन आदी संघटनांनीही पाठिंबा दिला.
विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास नको
सायडोंगर येथील टोरंट कंपनीच्या प्रस्तावित पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पामुळे जंगल, जैवविविधता, नैसर्गिक जलप्रवाह आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर संभाव्य परिणाम होण्याची भीती पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. याशिवाय पोशिर आणि शिलार धरण प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या गावांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिक नागरिकांचे नैसर्गिक साधनसंपत्तीवरील हक्क आणि पर्यावरणीय समतोल धोक्यात येऊ नये, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
दसऱ्याच्या दिवशी सायडोंगर परिसरात झालेल्या वृक्षतोडीचा निषेध करत संबंधित कारवाईची पारदर्शक माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणीही या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात आली. सह्याद्रीचे जंगल म्हणजे केवळ झाडे नसून संपूर्ण परिसंस्था आहे. त्यामुळे वृक्षतोडीनंतर झाडे लावण्याचे आश्वासन देऊन जंगलाचे नुकसान भरून निघणार नाही, अशी भूमिका पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत घटकांकडून मांडण्यात येत आहे.
एकूणच, कर्जतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या जनजागृती मोहिमेतून टोरंट, पोशिर आणि शिलार प्रकल्पांविरोधातील असंतोषाला संघटित व्यासपीठ मिळाले आहे. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत सह्याद्रीच्या संरक्षणासाठी दिलेला हा आवाज आगामी काळात कितपत व्यापक आंदोलनाचे रूप धारण करतो, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.






