दिवाळीच्या स्नेहमेळाव्यात मित्रांचा आनंदोत्सव
श्रीकांत खुपेरकर | कल्याण:
मैत्री म्हणजे केवळ ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी साजरा होणाऱ्या फ्रेंडशिप डेलाच एकमेकांना भेटणे नव्हे, तर वर्षभर ही नाती जपणे आणि त्यांना वेळ देणे होय. दैनंदिन रेल्वे प्रवासातून जुळलेली मैत्री आजही तितक्याच आपुलकीने जपणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या एका ग्रुपने याचे सुंदर उदाहरण घालून दिले आहे.
कोरोनापूर्वी सकाळी ८.०७ वाजताच्या कसारा-सीएसएमटी डबल फास्ट लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची एकमेकांशी ओळख झाली. कसारा, टिटवाळा, कल्याण, डोंबिवली आणि भांडुप येथील प्रवासी हळूहळू एकमेकांचे मित्र बनले. या मित्रांनी आपल्या ग्रुपचे नाव ‘कसारा सोल्जर ग्रुप’ असे ठेवले.
कोरोनानंतर लोकलच्या वेळापत्रकात बदल झाल्याने डोंबिवलीतील मित्रांनी सकाळी ७.५५ वाजताची अंबरनाथ-सीएसएमटी डबल फास्ट लोकल पकडण्यास सुरुवात केली. ही लोकल भांडुप येथेही थांबत असल्याने त्यांचा प्रवास सुरूच राहिला. मात्र, लोकल बदलली तरी मैत्रीचे नाते कायम राहिले.
यंदा दिवाळीनिमित्त कल्याणमधील अमोल भुरेवार यांनी ८ नोव्हेंबर रोजी कल्याणच्या रामदेव हॉटेलमध्ये भेटण्याचा संदेश ग्रुपवर पाठविला. त्याला मित्रांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत येण्याची तयारी दर्शविली. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार वडा सांबार, मेदूवडा सांबार, इडली सांबार आणि डोसा अशा पदार्थांचा आस्वाद घेतला.
या भेटीत निवृत्त मित्र उमेश शाह यांच्यासह एसी लोकलने प्रवास करणारे मित्रही सहभागी झाले होते. भांडुप, घाटकोपर, टिटवाळा, कल्याण, अंबरनाथ आणि डोंबिवली येथून मित्र आवर्जून आले होते. भोजनानंतर सर्वांनी छायाचित्रे काढून या आनंदाच्या क्षणांची आठवण जपली.
या स्नेहमेळाव्यात अमोल भुरेवार, विनय कदम, सुशील तांडेल, सुभाष पाटील, भावेश सोधा , संदीप आंब्रे, रवी वायदंडे , उमेश शाह, भूषण दागा , कुणाल गुरव, विश्वजीत काकडे, राणे साहेब आणि संदीप साठे सहभागी झाले होते.
“गेल्या वर्षी डोंबिवलीत भेटलो होतो, यंदा कल्याणमध्ये एकत्र आलो. रेल्वे प्रवासाने आमची ओळख करून दिली; मात्र आज आमचे मैत्रीचे नाते प्रवासापलीकडे गेले आहे. हीच खरी मैत्री,” असे अमोल भुरेवार यांनी सांगितले.
आजच्या धावपळीच्या जीवनात खऱ्या मैत्रीला वेळ देणे कमी होत चालले आहे. वाढत्या एकटेपणाच्या पार्श्वभूमीवर जवळच्या मित्रांची साथ मानसिक आणि भावनिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाची असल्याचे संशोधनातूनही अधोरेखित झाले आहे.
पैसा आणि प्रतिष्ठा काळानुसार बदलू शकतात; मात्र कठीण प्रसंगी साथ देणारे मित्र ही आयुष्यभराची संपत्ती असते. रोजच्या रेल्वे प्रवासातून सुरू झालेली ओळख आयुष्यभराच्या मैत्रीत कशी बदलू शकते, हे या ग्रुपने दाखवून दिले आहे.







