गुलसुंद्यातील २४ कुटुंबीयांचा डोंबिवलीत स्नेहमेळावा
जुन्या आठवणींनी रंगला कौटुंबिक सोहळा
श्रीकांत खुपेरकर | डोंबिवली:
सण-उत्सव हे केवळ आनंद साजरा करण्याचे निमित्त नसून जुन्या आठवणींना उजाळा देणारे आणि नातेसंबंध अधिक दृढ करणारे माध्यम असते. याचाच प्रत्यय डोंबिवलीत भाऊबीजेनिमित्त आयोजित एका अनोख्या कौटुंबिक स्नेहमेळाव्यात आला. पनवेल तालुक्यातील गुलसुंदा गावाशी नाते असलेल्या सुमारे २४ सदस्यांनी एकत्र येत भाऊबीज साजरी केली.
१९९० पर्यंत गुलसुंदा गावात ब्राह्मण समाजातील सुमारे ५० ते ६० कुटुंबे वास्तव्यास होती. मात्र, १९९० मध्ये पाताळगंगा नदीला आलेल्या पुरानंतर काही कुटुंबांनी गाव सोडून इतर ठिकाणी स्थलांतर केले. त्यानंतर नोकरी आणि रोजगाराच्या संधींच्या शोधात या कुटुंबांतील अनेक सदस्य वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थायिक झाले.

तब्बल ३६ वर्षांनंतर जोशी कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या नातेवाइकांनी डोंबिवलीतील पराग जोशी यांच्या निवासस्थानी भाऊबीजेनिमित्त एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
पराग जोशी यांनी महिनाभर आधीपासूनच नातेवाइकांना संपर्क साधून भाऊबीजेला आपल्या घरी आवर्जून येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यांच्या या निमंत्रणाला प्रतिसाद देत सुमारे २४ सदस्य एकत्र आले आणि सर्वांनी उत्साहात सण साजरा केला.
या भेटीदरम्यान अनेकांनी गुलसुंदा गावातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. गावातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणारी हनुमान जयंती आणि त्यानिमित्ताने एकत्र येणारा गावकरी परिवार यांचीही आठवण त्यांनी सांगितली.
या आनंदाच्या प्रसंगी पराग जोशी आणि त्यांच्या पत्नी मेघना जोशी यांनी सर्व नातेवाइकांसाठी खास पावभाजी व पुलाव तयार केला होता. सर्वांनी एकत्र बसून या मेजवानीचा आस्वाद घेतला.
जुन्या आठवणी सांगताना पराग जोशी म्हणाले की, पूर्वी पनवेलहून गुलसुंदा गावात पोहोचणे खूप कठीण होते. मात्र, आता एसटी बस, रिक्षा, टॅक्सी तसेच ओला आणि उबरसारख्या प्रवासी सुविधांमुळे प्रवास करणे सोपे झाले आहे.
भोजनानंतर काही सदस्यांनी मुकेश आणि किशोर कुमार यांच्यासारख्या दिग्गज गायकांची जुनी हिंदी गाणी गाऊन मैफलीत रंग भरला.
ही भाऊबीज केवळ सणाची मेजवानी न ठरता ३६ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या कुटुंबीयांसाठी जुन्या आठवणी, गावाशी असलेले नाते आणि कौटुंबिक जिव्हाळा जपणारा अविस्मरणीय क्षण ठरला







