२४ कोटींच्या रस्त्यावरील सुरक्षा रेलिंग उखडली
अवघ्या तीन वर्षांत रेलिंगची दुरवस्था
नुकसान करणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
नगरपालिकेच्या देखभालीवरही प्रश्नचिन्ह
आनंद सकपाळ | नेरळ:
पर्यटननगरी माथेरानमध्ये सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून तब्बल २४ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी रस्त्यावरील लोखंडी सुरक्षा रेलिंगची तोडफोड झाल्याची बाब समोर आली आहे. इंदिरा गांधी नगर प्रवेशद्वाराजवळ घडलेल्या या प्रकारामुळे सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसह तिच्या देखभालीबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
एमएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे २४ कोटी रुपये खर्च करून महात्मा गांधी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लोखंडी सुरक्षा रेलिंगही उभारण्यात आली होती. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल व जबाबदारी नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली. मात्र, अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत या रेलिंगची तोडफोड होऊन ती खिळखिळी झाल्याने सार्वजनिक निधीतून उभारलेल्या सुविधांचे संरक्षण नेमके कोण करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, ही रेलिंग लोखंडाची असल्याने ती नेमकी कोणी, कधी आणि कोणत्या साधनांच्या साहाय्याने तोडली, याचा शोध घेणे आवश्यक आहे. या तोडफोडीमागे लोखंडी साहित्याचा वैयक्तिक वापर करण्याचा हेतू आहे की अन्य कोणते कारण आहे, याबाबतही नागरिकांमध्ये विविध शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे केवळ दुरुस्ती करून हा विषय संपविण्याऐवजी तोडफोडीमागील नेमके कारण शोधून दोषींवर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, एवढ्या मोठ्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले असतानाही नगरपालिकेच्या स्तरावर अद्याप ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नसल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी याच रस्त्यावरून नियमित ये-जा करतात. असे असतानाही या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष कसे गेले नाही, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
माथेरान हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून, येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या सुरक्षा रेलिंगला विशेष महत्त्व आहे. अशा संरक्षक व्यवस्थेची तोडफोड होणे ही केवळ सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची बाब नसून पर्यटकांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर समस्या आहे. त्यामुळे नगरपालिकेने तातडीने घटनास्थळाची पाहणी करावी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्यास त्याची तपासणी करावी, संबंधित घटनेची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी आणि तुटलेली सुरक्षा रेलिंग त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या सार्वजनिक सुविधा जपण्याची जबाबदारी प्रशासनासोबत नागरिकांचीही आहे. मात्र, अशा मालमत्तेची उघडपणे तोडफोड होत असेल आणि त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असेल, तर माथेरानच्या विकासकामांचे भवितव्य काय? सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार, हा प्रश्न आता माथेरानकरांकडून उपस्थित केला जात आहे.







