आमदार महेंद्र थोरवे यांची मंगेश काळोखे कुटुंबीयांना पाडव्याला भेट
राजकीय कार्यकर्त्याच्या पलीकडे जपले माणुसकीचे नाते
काळोखे कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा दिला विश्वास
प्रथमेश कुडेकर | खोपोली:
राजकारणात नेते आणि कार्यकर्ते यांच्यातील संबंध अनेकदा राजकीय समीकरणांपुरते मर्यादित असल्याचे पाहायला मिळते. मात्र, एखादा कार्यकर्ता संकटात असताना त्याच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि दिलेल्या शब्दाची जाणीव ठेवणे, हीच खरी माणुसकी असल्याचे उदाहरण आमदार महेंद्र थोरवे यांनी घालून दिले आहे. दीपावली पाडव्याच्या निमित्ताने आमदार महेंद्र थोरवे यांनी मंगेश काळोखे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या या भेटीची परिसरात चर्चा होत आहे.
खोपोली येथे मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या दुर्दैवी घटनेमुळे काळोखे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला गमावल्याने निर्माण झालेली पोकळी आणि त्यानंतर कुटुंबीयांना करावा लागणारा संघर्ष अत्यंत वेदनादायी होता. या घटनेनंतर मंगेश काळोखे यांच्या लहान मुलींनी ‘आम्हाला न्याय हवा’ अशी आर्त मागणी केली होती. त्यांच्या या भावनिक आक्रोशाने अनेकांची मने हेलावली होती.
या कठीण प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांनी काळोखे कुटुंबीयांना आधार देण्याची भूमिका घेतली होती. ‘माझा जवळचा कार्यकर्ता मंगेश काळोखे आज आपल्यात नसला, तरी त्याच्या कुटुंबाला मी उघड्यावर पडू देणार नाही. माझ्या बहिणीची मी नक्कीच काळजी घेईन,’ अशा शब्दांत त्यांनी कुटुंबीयांना विश्वास दिला होता. हा केवळ राजकीय कार्यकर्त्याच्या कुटुंबाला दिलेला दिलासा नव्हता, तर कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती.
याच भावनेतून दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आमदार महेंद्र थोरवे यांनी मंगेश काळोखे यांच्या घरी भेट दिली. सणासुदीच्या काळात कुटुंबीयांची विचारपूस करत त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न केला. आनंदाच्या सणातही आपल्या कुटुंबातील व्यक्तीची उणीव जाणवणाऱ्या काळोखे कुटुंबीयांना या भेटीतून मानसिक आधार देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
विशेष म्हणजे, मंगेश काळोखे यांच्या निधनानंतरही त्यांच्या कुटुंबीयांना विसरले नाहीत, ही बाब या भेटीतून अधोरेखित झाली. राजकीय व्यासपीठावर कार्यकर्त्यांना महत्त्व देणारे अनेक नेते दिसतात; मात्र कार्यकर्ता हयात नसतानाही त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आणि भावनिक नाते जपण्याची भूमिका महत्त्वाची ठरते.
‘मंगेश आज आपल्यात नसला तरी त्याचे कुटुंब एकटे नाही,’ हा विश्वास काळोखे कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमदार महेंद्र थोरवे यांनी या भेटीतून केला. राजकारणापलीकडे जाऊन माणुसकीचे नाते जपणारी ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
दिलेला शब्द केवळ बोलण्यापुरता न ठेवता, दुःखाच्या काळातही त्याची जाणीव ठेवणे, हीच या पाडवा भेटीची खरी भावनिक बाजू म्हणावी लागेल.







