शिक्षणापासून भाईगिरीपर्यंत घेतला समाचार
‘आमदार थोरवे नालायक, कर्जतमध्ये भाईगिरी खपवून घेणार नाही’
तटकरे कुटुंबीयांवरील टीकेला राष्ट्रवादीचे आक्रमक प्रत्युत्तर
टोरंट प्रकल्पाच्या समर्थनावरूनही घेरले
आनंद सकपाळ | नेरळ:
शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील राजकीय संघर्ष आता अधिकच तीव्र झाला आहे. खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यावर आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सोमवारी कर्जत येथे पत्रकार परिषद घेऊन आक्रमक प्रत्युत्तर दिले. यावेळी घारे यांनी थोरवेंच्या राजकीय भूमिकेपासून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेपर्यंत, तसेच कर्जत मतदारसंघातील कथित भाईगिरीच्या मुद्द्यापर्यंत अनेक विषयांवर थेट निशाणा साधला. ‘कर्जतमध्ये भाईगिरी चालणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे कर्जतच्या राजकीय वर्तुळात नव्या आरोप- प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
आमदार अनिकेत तटकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महेंद्र थोरवे यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर सुधाकर घारे यांनी त्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २०१७ मध्ये अनिकेत तटकरे आमदार झाले, त्यावेळी महेंद्र थोरवे आणि इतर नेते एकत्रितपणे राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विजयासाठी काम करत होते. त्यावेळी राजकीय सहकार्य करणाऱ्यांनी आज अचानक टीकेची भूमिका का घेतली, असा सवाल घारेंनी उपस्थित केला. पूर्वीची राजकीय साथ विसरून तटकरे कुटुंबीयांवर टीका करण्याचा अधिकार थोरवेंना कोणी दिला, असा सवाल करत त्यांनी थोरवेंच्या विधानांचा समाचार घेतला.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याबाबत आमदार थोरवे यांनी केलेल्या विधानांवरही घारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी थोरवे यांचा उल्लेख ‘नालायक आमदार’ असा करत त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. इतकेच नव्हे, तर थोरवेंच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा उपस्थित करत २०२४ मध्ये त्यांनी दहावी उत्तीर्ण झाल्याचा दाखला दिल्याचा दावा केला. स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेबाबतच प्रश्न उपस्थित होत असताना इतरांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार काय, असा सवाल घारेंनी केला.
कर्जतमध्ये भाईगिरीला थारा नाही
कर्जत मतदारसंघाने आजवर अनेक आमदार पाहिले; मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधीने मतदारसंघातील शांतता आणि सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला नाही, असे घारे म्हणाले. कर्जतची राजकीय संस्कृती ही शांततेची असून येथे भाईगिरीला कधीही थारा नव्हता आणि यापुढेही ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. याशिवाय आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी संबंधित एका कथित घातपाताच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. मतदारसंघातील महिला बेपत्ता होण्याच्या घटना आणि खुनाच्या घटनांचा संदर्भ देत या प्रकरणांमध्येही सखोल तपास व्हावा आणि संबंधितांची चौकशी व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, या आरोपांबाबत संबंधित यंत्रणांनी तपास करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे.
टोरंट प्रकल्पाच्या समर्थनावरूनही थोरवेंना घेरले
कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरातील टोरंट पंप्ड स्टोरेज प्रकल्प आणि त्यासाठी झालेल्या वृक्षतोडीचा मुद्दाही या पत्रकार परिषदेच्या केंद्रस्थानी राहिला. या प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि विविध राजकीय संघटनांकडून आंदोलन सुरू असताना आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रकल्पाच्या समर्थनार्थ घेतलेल्या भूमिकेवर घारे यांनी टीका केली. साई डोंगरातील वृक्षतोडीचा प्रश्न गंभीर असताना विकासाच्या नावाखाली नेमके कोणाचे हित साधले जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
टोरंट प्रकल्पाच्या मुद्द्यावरून नागरिकांमध्ये असलेली नाराजी आणि पर्यावरणाच्या प्रश्नांवरून सुरू असलेली चर्चा बाजूला सारण्यासाठी तटकरे कुटुंबीयांवर टीका करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही घारे यांनी केला. त्यामुळे थोरवेंच्या राजकीय भूमिकेवरच नव्हे, तर त्यांच्या विकासाच्या संकल्पनेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
भरत भगत यांचाही थोरवेंवर निशाणा
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भरत भगत यांनीही आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीकास्त्र सोडले. गुवाहाटी दौऱ्याचा संदर्भ देत स्वतःच्या पक्षातील नेत्यांशी निष्ठा न राखणाऱ्या व्यक्तीवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. थोरवे यांची राजकीय भूमिका घातक असल्याची टीकाही भगत यांनी केली.
दरम्यान, खासदार श्रीरंग बारणे यांच्यावरही सुधाकर घारे यांनी निशाणा साधला. तटकरे यांच्यावर वारंवार टीका करून राजकीय चर्चेत राहण्यापेक्षा कर्जतच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा, असा अप्रत्यक्ष सल्ला त्यांनी दिला.
एकूणच, थोरवे विरुद्ध तटकरे असा सुरू झालेला राजकीय संघर्ष आता स्थानिक पातळीवर अधिक आक्रमक वळण घेत आहे. एका बाजूला टोरंट प्रकल्पावरून पर्यावरण आणि विकासाचा मुद्दा तापलेला असताना दुसरीकडे नेत्यांमधील वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सुधाकर घारे यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता आमदार महेंद्र थोरवे आणि शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे कर्जतच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.







