शेकडो दीप उजळवत हुतात्म्यांना अभिवादन
दीपावली पाडव्यानिमित्त भरत मास्तर प्रतिष्ठानचा प्रेरणादायी उपक्रम
भारताच्या नकाशासह ‘व्यर्थ न जावो बलिदान’ संदेशातून भाई कोतवाल, गोमाजी पाटील आणि क्रांतिवीर साथीदारांच्या स्मृतींना उजाळा
आनंद सकपाळ | नेरळ:
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिवीरांच्या स्मृती कायम तेवत राहाव्यात आणि नव्या पिढीच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित व्हावी, या उद्देशाने दीपावली पाडव्याच्या निमित्ताने बलिदानभूमी सिद्धगडावर आयोजित करण्यात येणाऱ्या दीपोत्सवाने यंदा दहाव्या वर्षात पदार्पण केले. भरत मास्तर प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात शेकडो दिव्यांच्या प्रकाशात हुतात्मा भाई विठ्ठल लक्ष्मण कोतवाल, हुतात्मा गोमाजी हिराजी पाटील आणि त्यांच्या क्रांतिवीर सहकाऱ्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

दीपावलीच्या दिवशी प्रत्येक जण आपल्या घरात दिवंगत आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक दिवा प्रज्वलित करून त्यांचे स्मरण करतो. त्याच भावनेतून देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या स्मृतींनाही दीप लावून अभिवादन केले पाहिजे, या विचारातून भरत मास्तर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत भगत यांनी या उपक्रमाची सुरुवात केली. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या सीमेवर असलेल्या ऐतिहासिक सिद्धगडावर हा दीपोत्सव सुरू करण्यात आला. आज या उपक्रमाने दशकपूर्तीचा टप्पा गाठला आहे.

यंदाच्या दीपोत्सवाचे आयोजन सिद्धगडावरील हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा गोमाजी पाटील यांच्या स्मारक परिसरात करण्यात आले होते. सायंकाळी हरिपाठ आणि पोवाड्यांच्या कार्यक्रमाने वातावरण देशभक्तीमय झाले. शाळकरी विद्यार्थ्यांसह लहान मुलांनी, विद्यार्थिनींनी तसेच उपस्थित नागरिकांनी हुतात्म्यांच्या कार्याचे स्मरण करत आपली मनोगते व्यक्त केली. इतिहासातील या क्रांतिकारकांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

यानंतर स्मारक परिसरात भारताचा नकाशा आणि ‘व्यर्थ न जावो बलिदान’ हा संदेश शेकडो दिव्यांच्या माध्यमातून साकारण्यात आला. या प्रकाशमय दृश्यातून स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. दिव्यांच्या उजेडाने संपूर्ण स्मारक परिसर उजळून निघाला. यावेळी कर्जत आणि मुरबाड तालुक्यांतील देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिद्धगडचा रक्तरंजित स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास
मुरबाड तालुक्यातील ऐतिहासिक सिद्धगड हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा साक्षीदार आहे. २ जानेवारी १९४३ रोजी ब्रिटिश सत्तेविरोधात लढताना हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा गोमाजी हिराजी पाटील यांनी याच सिद्धगडावर आपल्या प्राणांची आहुती दिली. आझाद दस्ता आणि त्यांच्या क्रांतिकारक सहकाऱ्यांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान आजही या भूमीच्या इतिहासात अजरामर आहे.

या हुतात्म्यांच्या स्मृती केवळ स्मारकांपुरत्या मर्यादित न राहता त्या प्रत्येकाच्या मनात जिवंत राहाव्यात, त्याग आणि देशभक्तीची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी, या हेतूने भरत मास्तर प्रतिष्ठानचा हा दीपोत्सव महत्त्वपूर्ण ठरत आहे. दिवाळीच्या रोषणाईला स्वातंत्र्यवीरांच्या स्मरणाची जोड देणारा हा उपक्रम म्हणजे इतिहासाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनोखा प्रयत्न असून, सिद्धगडावरील शेकडो दिव्यांनी यंदाही हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण उजळून टाकली.








