लोहगड, जंजिरानंतर यंदा सिंहगडावर स्वारी
मांडवा ग्रुपच्या चिमुकल्यांनी साकारला ऐतिहासिक सिंहगड
दिगंबर चंदने | कर्जत:
महाराष्ट्रात किल्ल्यांचं आणि दिवाळीचं एक अतूट नातं आहे. दिवाळीची चाहूल लागताच घराघरांतून लहान मुले, शाळकरी मुले किल्ले बनवायला लागतात. याच परंपरेला उजाळा देत मांडवा ग्रुप, डेक्कन जिमखाना, कर्जत येथील मुलांनी यंदा सिंहगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारली आहे.
मांडवा ग्रुपच्या मुलांना किल्ला बनवण्याचं हे तिसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी त्यांनी लोहगड, दुसऱ्या वर्षी जंजिरा आणि तिसऱ्या वर्षी सिंहगड किल्ला साकारला आहे. दरवर्षी त्यांचा उत्साह वाढतच चालला आहे.

यंदाच्या सिंहगड किल्ल्यासाठी मुलांनी माती, दगड, चिखल या नैसर्गिक साहित्याचा वापर केला आहे. किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज, गड चढणारे मावळे, लढाई करणारे मावळे, तोफा, मातीचे सैनिक, किल्ल्याच्या पायथ्याचे गाव, भाजी मंडई अशी सगळी रचना अगदी हुबेहूब साकारली आहे.
या उपक्रमात क्षितिज गुप्ता, मयंक गुप्ता, देवेश गुप्ता, तुषार गुप्ता, पार्थ गुप्ता, चेतन गुप्ता, अनमोल गुप्ता, अंकेश गुप्ता, अनिरुद्ध कदम, मोहित जाधव, प्रज्ञेश मगर, कुणाल गुप्ता, हर्ष शहा, हृषिकेश मगर या मुलांनी सहभाग घेतला. या मुलांनी अभ्यास आणि परीक्षेच्या व्यापातून वेळ काढून हा अनोखा उपक्रम राबवला आहे.
भावी पिढीला किल्ल्याची ओळख व्हावी या करिता किल्ल्या संदर्भातील माहिती फलक देखील लावण्यात आला आहे. व शेजारी श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र देखील लावण्यात आले आहे.
मुलांच्या या उपक्रमाचं परिसरातून कौतुक होत आहे. मातीच्या किल्ल्याच्या माध्यमातून इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.








