प्रवाशांना कल्याणपर्यंत जाऊन पुन्हा कर्जतला यावे लागते
दोन्ही दिशांना थांबे देण्याची मागणी
श्रीकांत खुपेरकर | कर्जत:
मध्य रेल्वेच्या मार्गावरील महत्त्वाचे जंक्शन असलेल्या कर्जत स्थानकाकडे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांच्या व्यावसायिक थांब्यांच्या बाबतीत दुर्लक्ष होत असल्याने कर्जत आणि परिसरातील हजारो प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक एक्स्प्रेस गाड्या कर्जत स्थानकातून जातात; मात्र त्यांना प्रवाशांसाठी अधिकृत थांबा नसल्याने प्रवाशांना कल्याणपर्यंत जाऊन पुन्हा लोकलने कर्जतला परतावे लागते. त्यामुळे त्यांच्या प्रवासात दीड ते दोन तासांचा अनावश्यक वेळ खर्च होतो.

या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी पनवेल येथील अनिरुद्ध पाटील यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) तसेच अन्य संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना पत्र पाठवून कर्जत स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना व्यावसायिक थांबे देण्याची मागणी केली आहे.

पाटील यांच्या म्हणण्यानुसार, कर्जत आणि आसपासच्या परिसराची एकत्रित लोकसंख्या दहा लाखांहून अधिक आहे. दक्षिण भारतातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या तसेच मुंबईहून दक्षिणेकडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या कर्जत स्थानकातून जातात; मात्र त्यांना प्रवाशांसाठी नियोजित थांबा दिलेला नाही. विशेष म्हणजे, भोर घाटातील चढणीसाठी बँकर इंजिन जोडणे किंवा काढणे यांसारख्या तांत्रिक कारणांसाठी यातील अनेक गाड्या कर्जत स्थानकावर थांबतात. त्यामुळे या थांब्यांचा प्रवाशांच्या सोयीसाठी व्यावसायिक थांब्यांमध्ये विचार केल्यास मोठा दिलासा मिळू शकतो.

पुणे किंवा दक्षिणेकडील शहरांतून कर्जतला येणाऱ्या प्रवाशांची विशेष गैरसोय होते. कर्जतला अधिकृत थांबा नसल्याने त्यांना कल्याणपर्यंतचे तिकीट काढावे लागते. त्यानंतर कल्याणहून कर्जतपर्यंत लोकलचे स्वतंत्र तिकीट घ्यावे लागते. त्यामुळे आर्थिक भुर्दंड, तिकीट खिडक्यांवरील रांगा, अतिरिक्त प्रवास आणि सामान घेऊन फलाट बदलण्याचा त्रास सहन करावा लागतो.

रेल्वे व्यवस्था प्रवाशांच्या सोयीसाठी आहे की त्यांचा प्रवास अधिक त्रासदायक करण्यासाठी, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वे प्रवास परवडणारा असल्याने अनेक प्रवासी रेल्वेलाच प्राधान्य देतात. अशा वेळी महत्त्वाच्या स्थानकांवर आवश्यक थांबे न मिळणे ही गंभीर बाब आहे.
पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कर्जतचे महत्त्व आणखी वाढणार आहे. कर्जतहून पनवेल, खोपोली तसेच कल्याण-कर्जत मार्गावरील विविध स्थानकांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या स्थानकाचा मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी कर्जत येथे दोन्ही दिशांना थांबे मिळाल्यास प्रवाशांना मोठी सोय होईल.

आता कर्जत प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी हा प्रश्न एकत्रितपणे रेल्वेमंत्री आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडे लावून धरण्याची वेळ आली आहे. अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशांना योग्य त्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना व्यावसायिक थांबे मिळण्यासाठी ठोस पाठपुरावा करण्याची गरज आहे.
कर्जत हे केवळ बँकर इंजिन जोडण्यासाठी किंवा काढण्यासाठी असलेले स्थानक नाही, तर दहा लाखांहून अधिक लोकसंख्येच्या परिसराला सेवा देणारे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. रेल्वे प्रशासनाने या स्थानकाचे महत्त्व ओळखून प्रवाशांना आवश्यक सुविधा आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे थांबे द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








