सह्याद्रीचे २३ प्रकल्प रद्द करा, मगच सह्याद्रीत पाऊल ठेवा
कर्जतच्या टिळक चौकातील सभेतून सरकारला थेट आव्हान
एक लाख लोकांना घेऊन पुन्हा कर्जतमध्ये येऊ – सयाजी शिंदेंचा निर्धार
आनंद सकपाळ | नेरळ:
कर्जत तालुक्यातील साय डोंगर परिसरात टोरंट पॉवरच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी झालेल्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. या वृक्षतोडीविरोधात सुरू असलेल्या जनआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे तसेच विद्यार्थी नेते विवेकानंद पाटील यांनी कर्जतच्या टिळक चौकात आयोजित जाहीर सभेतून सरकारवर जोरदार टीका केली. ‘विकासाच्या नावाखाली सह्याद्रीचा विनाश सहन केला जाणार नाही.
सह्याद्रीतील २३ प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याची घोषणा सरकारने करावी, अन्यथा सह्याद्रीत येऊन दाखवावे,’ असे थेट आव्हान विवेकानंद पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारला दिले. तर, ‘झाडे तोडणाऱ्यांना विकासाच्या नावाखाली मोकळे सोडता कामा नये. या जंगलाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकजूट कायम ठेवावी,’ असे आवाहन सयाजी शिंदे यांनी केले.
सभेत बोलताना विवेकानंद पाटील यांनी सरकारच्या पर्यावरणविषयक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पर्यावरणीय संवेदनशीलता केवळ भाषणांमध्ये आणि कागदोपत्री न दाखवता प्रत्यक्ष कृतीतून दिसली पाहिजे, असे सांगत त्यांनी ऋषींच्या निसर्गकेंद्री तत्त्वज्ञानाचा संदर्भ दिला. ‘निसर्गाकडे चला’ हा संदेश देणाऱ्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार करून मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने एकदा सह्याद्रीकडे यावे. मात्र, सह्याद्रीत येण्यापूर्वी येथील २३ प्रकल्प रद्द केल्याची घोषणा करावी, असे आव्हान त्यांनी दिले.
साय डोंगरातील वृक्षतोड ही केवळ पर्यावरणाची हानी नसून सह्याद्रीच्या अस्तित्वावर घाला असल्याची भूमिका मांडताना पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना शेवटपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले. ‘सरकार मायबाप नसून जनता मायबाप आहे. जनतेमध्ये प्रचंड ताकद आहे. ही ताकद एकत्र आली तर कोणत्याही सरकारला झुकवता येते,’ असे ते म्हणाले. आंदोलन करताना अहिंसेचा मार्ग सोडू नका; मात्र अन्यायाविरोधात ठामपणे आवाज उठवत राहा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वृक्षतोडीला विरोध करण्याबरोबरच सह्याद्रीच्या परिसरात बाहेरील भांडवलशाही शक्तींच्या माध्यमातून स्थानिकांच्या जमिनी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर अतिक्रमण होत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. मराठी माणसांच्या हक्कांसाठी आणि सह्याद्रीच्या संरक्षणासाठी ही लढाई असल्याचे सांगत त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात जाण्याचा सध्या विचार नसल्याचे स्पष्ट केले. ‘मी बोलत राहीन, आंदोलन करत राहीन; मात्र त्यासाठी जनतेने माझ्या पाठीशी उभे राहावे. मी कोणाकडूनही पैसे घेणार नाही किंवा व्यवस्थेपुढे झुकणार नाही,’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी विवेकानंद पाटील यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले. ‘महाराष्ट्रात पर्यावरणासाठी एवढ्या ठामपणे भूमिका घेणारी तरुण माणसे कमी दिसतात. विवेकानंदसारखा अभ्यासू आणि माणसांची काळजी करणारा तरुण पुढे येणे ही चांगली बाब आहे,’ असे सांगत त्यांनी उपस्थित नागरिकांच्या एकजुटीचेही कौतुक केले. झाडांसाठी एवढ्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरल्याचे दृश्य आपण पहिल्यांदाच पाहत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सह्याद्रीतील वृक्षतोडीचे गांभीर्य स्पष्ट करताना शिंदे यांनी झाडांना केवळ लाकूड किंवा नैसर्गिक साधन म्हणून पाहण्याच्या मानसिकतेवर टीका केली. एका झाडावर अनेक जीवसृष्टी आणि प्रजाती अवलंबून असतात. त्यामुळे झाड तोडल्यानंतर केवळ त्याची संख्या कमी होत नाही, तर संपूर्ण परिसंस्थेचे नुकसान होते. हजारो वर्षांत विकसित झालेल्या जंगलाची भरपाई काही हजार रोपे लावून होऊ शकत नाही. ‘नव्वद हजार झाडे लावणार असाल तर आधी ती नव्वद वर्षे वाढू द्या आणि त्यानंतर जंगल तोडण्याची परवानगी मागा,’ अशा शब्दांत त्यांनी वृक्षारोपणाच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केला.
धरणग्रस्त म्हणून स्वतःचा अनुभव सांगताना सयाजी शिंदे यांनी विस्थापनाच्या वेदना मांडल्या. त्यांच्या कुटुंबाची जमीन धरणासाठी गेल्यानंतर केवळ १४ हजार रुपये मिळाले होते. पुनर्वसन आणि जमिनीच्या हक्कासाठी अनेक वर्षे संघर्ष करावा लागला. नोकरीच्या नावाखाली गावातील तरुणांना सुरक्षारक्षकांच्या नोकऱ्या मिळाल्या; मात्र त्यातून त्यांच्या आयुष्याला अपेक्षित स्थैर्य मिळाले नाही. तब्बल चाळीस वर्षांनंतर त्यांना एक एकर जमीन मिळाल्याचे सांगत त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनातील त्रुटींवर बोट ठेवले. ‘जमीन गेल्यानंतर एका पिढीचे आयुष्य संघर्षात जाते. त्यामुळे विकासाच्या नावाखाली स्थानिकांना विस्थापित करण्यापूर्वी त्यांच्या भविष्याचा विचार झाला पाहिजे,’ असे त्यांनी सांगितले.
आपल्या आईच्या स्मृतीतून सुरू केलेल्या बीजतुला उपक्रमाची माहिती देताना शिंदे भावूक झाले. आईच्या वजनाएवढ्या बिया गोळा करून त्या महाराष्ट्रभर लावण्याचा संकल्प त्यांनी केला होता. त्या बियांपासून उगवलेली झाडे वाढताना, त्यांना फुले-फळे येताना आणि पक्षी त्यावर विसावताना आई पुन्हा जिवंत असल्याची भावना निर्माण होते, असे त्यांनी सांगितले. ‘झाडे म्हणजे माझ्यासाठी आई-वडिलांसारखी आहेत. साय डोंगरातील वृक्षतोड पाहून माझ्या आई-वडिलांनाच मारल्यासारखे वाटते. त्यामुळे हा लढा मी शेवटपर्यंत सोडणार नाही,’ असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
शिंदे यांनी वनविभागाच्या वृक्षगणनेच्या निकषांवरही प्रश्न उपस्थित केले. मोठ्या वृक्षांची गणना आणि झुडपे, वेली तसेच इतर वनस्पतींचे पर्यावरणीय महत्त्व याकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. साय डोंगर परिसरातील शंभरबुटी झाडे आणि अनेक किलोमीटर विस्तार असलेल्या गारंबीच्या वेलींचे नुकसान झाल्याचा उल्लेख करत, अशा वनस्पतींनाही संरक्षणाच्या चौकटीत महत्त्वाचे स्थान मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. वृक्षतोडीची परवानगी देणाऱ्या नियमांचा आणि कायद्यांमधील पळवाटांचा पुनर्विचार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
‘आईने जन्म दिल्यानंतर माणसाला पहिला ऑक्सिजन झाडांमुळे मिळतो. श्रीमंती म्हणजे सोने किंवा पैसा नव्हे, तर शुद्ध हवा, पाणी आणि अन्न आहे. ऑक्सिजन नसेल तर कितीही संपत्ती असून उपयोग नाही,’ असे सांगत त्यांनी पैशाच्या आमिषापोटी जमिनी विकणाऱ्या स्थानिकांना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. एजंट आणि दलालांच्या माध्यमातून शेतजमिनींचे व्यवहार करणाऱ्यांनी भविष्यातील पिढ्यांचा विचार करावा, असेही ते म्हणाले.
या सभेत पेज नदीच्या संरक्षणाचाही मुद्दा उपस्थित झाला. सह्याद्रीतील नद्या या महाराष्ट्राच्या रक्तवाहिन्या असून, जंगलतोड आणि अनियंत्रित प्रकल्पांमुळे नद्यांच्या अस्तित्वावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता शिंदे यांनी व्यक्त केली. ‘जंगल वाचवायचे असेल तर नद्या वाचवाव्या लागतील. पेस नदी ही आपल्या आईसारखी आहे; तिचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे,’ असे त्यांनी सांगितले.
यावेळी भीमाशंकर परिसरातून आलेल्या सुजन टुपरे यांनी साय डोंगरातील वृक्षतोडीचा अनुभव मांडताना तोडलेल्या औदुंबराच्या झाडाचा आणि त्याला जोडलेल्या बेलवेलीचा उल्लेख केला. झाडाचा बुंधा कापल्यानंतरही त्यातून फुटणारे अंकुर पाहून मन हेलावल्याचे त्यांनी सांगितले. भीमाशंकर अभयारण्यातील आदिवासी समाजाचे जीवन, वनौषधी आणि जंगलाशी असलेले नाते स्पष्ट करत त्यांनी या आंदोलनाला पुणे जिल्ह्यातूनही सक्रिय पाठिंबा देण्याची ग्वाही दिली.
सभेत स्थानिक पत्रकार, पर्यावरणप्रेमी आणि विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांनीही भूमिका मांडल्या. पत्रकारांना सरसकट विकले गेले असे संबोधणे योग्य नसल्याचे स्पष्ट करत काही पत्रकारांनी वृक्षतोडीविरोधातील वार्तांकनासाठी घेतलेल्या मेहनतीचा उल्लेख केला. जंगलतोडीनंतर घटनास्थळी वारंवार भेट देऊन वस्तुस्थिती मांडणाऱ्या पत्रकारांचे सयाजी शिंदे यांनी कौतुक केले.
राजकीय पक्षांनी आणि लोकप्रतिनिधींनी जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहन करताना शिंदे यांनी मतदारांनीही आपल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची गरज अधोरेखित केली. ‘पैसे, गाड्या आणि आमिषे घेण्यापेक्षा चांगले लोकप्रतिनिधी निवडणे महत्त्वाचे आहे. लोकशाहीत मतदारांना प्रश्न विचारण्याचा आणि जाब मागण्याचा अधिकार आहे,’ असे ते म्हणाले.
आंदोलनाची एकजूट कायम राहिल्यास भविष्यात एक लाख नागरिकांना सोबत घेऊन कर्जतमध्ये येण्याचा निर्धारही सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. ‘सह्याद्रीतील उरलेली झाडे ही शेवटची झाडे समजून त्यांचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा प्रत्येकाने केली पाहिजे. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. एकी कायम ठेवा,’ असे आवाहन त्यांनी केले.
या सभेत विवेकानंद पाटील, सयाजी शिंदे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील विविध भागांतील कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. साय डोंगरातील वृक्षतोडीविरोधातील लढा केवळ कर्जतपुरता मर्यादित न राहता राज्यव्यापी लोकचळवळ बनविण्याचा निर्धार या सभेतून व्यक्त करण्यात आला.







