शिवसेनेचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा
आठवडाभरात दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास १६ नोव्हेंबरला खड्ड्यात बसून आंदोलन
प्रमिला ताई बोराडे यांचे उपविभागीय अभियंत्यांना निवेदन
रायगडचे वादळ न्युज नेटवर्क | कर्जत:
कर्जत शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील रेल्वे ब्रिजवरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, खचलेल्या साईडपट्ट्या आणि रस्त्याच्या कडेला वाढलेली काटेरी झुडपे यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावेत तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्यांची डागडुजी करून परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात शिवसेनेच्या महिला पदाधिकारी तथा हालिवली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. प्रमिला ताई सुरेश बोराडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्जत उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. तसेच येत्या आठवडाभरात दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास सोमवार दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता याच रस्त्यावरील खड्ड्यात बसून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, रेल्वे ब्रिजवरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्या मोठ्या प्रमाणात खचल्या आहेत. त्यामुळे मुख्य रस्ता आणि साईडपट्टी यांच्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यातच रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, रस्त्याच्या कडेला बोरीची काटेरी झाडे आणि झुडपे वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.

या मार्गावरून दररोज विद्यार्थी, पालक, स्थानिक नागरिक, दुचाकीस्वार, रिक्षा, चारचाकी तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. विशेषतः शनिवार आणि रविवारच्या दिवशी कर्जत परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी अनेक नागरिक रस्त्याच्या बाजूच्या साईडपट्टीचा वापर करतात. मात्र, साईडपट्ट्यांची झालेली दुरवस्था आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे. या परिस्थितीत यापूर्वीही अनेक छोटे-मोठे अपघात घडल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सध्या कर्जतकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ‘सह्याद्री वाचवा, टोरंट हटवा’ या आंदोलनामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे, तर देश-विदेशातूनही पर्यावरणप्रेमी, शिवप्रेमी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर साईडोंगर परिसराला भेट देण्यासाठी येत आहेत. अनेक दिग्गज नेते, अभिनेते, समाजसेवक आणि पर्यावरणप्रेमींनी याच मार्गावरून प्रवास केला आहे. अशा परिस्थितीत कर्जतच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील रस्त्याची ही दुरवस्था पाहून बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या मनात कर्जतच्या सार्वजनिक सुविधा आणि प्रशासनाबाबत काय प्रतिमा निर्माण होत असेल, याचाही संबंधित विभागाने गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय भाऊबीज सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक भाऊ आपल्या बहिणींच्या भेटीसाठी याच मार्गावरून प्रवास करणार आहेत. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आनंदावर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे विरजण पडू नये आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे बोराडे यांनी स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी मार्च २०२६ मध्येही याच समस्येबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर साईडपट्टी भरण्याचे काम सुरू करण्यात आले; मात्र ते काम अर्धवटच सोडून देण्यात आले. हे काम अपूर्ण का ठेवण्यात आले, असा सवाल उपस्थित करत विभागाकडे या छोट्याशा कामासाठी निधी उपलब्ध नसेल तर तसे स्पष्टपणे सांगावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. निधीची कमतरता असल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ‘भीक मागो’ आंदोलन करून निधी उपलब्ध करून देण्यासही तयार असल्याचा उपरोधिक इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
रेल्वे ब्रिजवरील साईडपट्ट्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे आणि स्वच्छता करणे हे काम फार मोठे किंवा खर्चिक नसून, संबंधित विभागाने मनावर घेतल्यास दोन दिवसांतही पूर्ण होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करावी, अशी ठाम भूमिका बोराडे यांनी मांडली आहे.
१६ नोव्हेंबरला आंदोलनाचा इशारा
येत्या आठवडाभरात दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास सोमवार दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता रेल्वे ब्रिजवरील याच खड्ड्यांमध्ये बसून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे होणाऱ्या गैरसोयीस संबंधित विभाग आणि प्रशासन जबाबदार राहील, असेही नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, हे निवेदन देताना कर्जत पंचायत समितीच्या उपसभापती सौ. चित्रा ताई जगदीश ठाकरे, हालिवलीच्या माजी सरपंच सौ. प्रमिला ताई सुरेश बोराडे, सौ. मंदाताई ताई वासुदेव हाडप, सौ. दर्शना ताई अशोक भोईर, उमरोलीचे माजी विभागप्रमुख सुरेश बोराडे आणि कट्टर शिवसैनिक अशोक भोईर आदी उपस्थित होते.
यावेळी नायब तहसीलदार मृणाली शिरसाट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले. रेल्वे ब्रिजवरील रस्त्याची दुरवस्था दूर करून नागरिकांना सुरक्षित आणि सुकर वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, हीच या निवेदनामागील प्रमुख मागणी आहे.







