वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आवाहन
दिपक बोराडे | नेरळ:
आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागून आकलनासह वाचन वेग वाढावा या उद्देशाने ज्ञान प्रबोधिनी- छात्र प्रबोधन पुणे यांच्या मार्फत वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी नेरळ विद्या भवन माध्यमिक विद्यालय धामोते शाळेत सातत्याने अभिनव उपक्रम राबविले जातात. त्यानुषंगाने प्रबोधन दूत सेवाज्येष्ठ सहाय्यक शिक्षक सचिन अभंगे यांच्या सहकार्याने यावर्षीचा ‘दीपोत्सव २०२६ वाचन दिवाळी’ म्हणून साजरा करण्यासाठी आवाहन केले आहे. वाचन दिवाळी या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे.
कुमार वयोगटासाठी सुबोध ग्रामीण दिवाळी अंकाचे इयत्ता पाचवी ते सातवीच्या पन्नास विद्यार्थ्यांना सेवाज्येष्ठ सहाय्यक शिक्षक संतोष कांबरी यांच्या शुभहस्ते वितरण करण्यात आले. दरम्यान, NEP 2020 नुसार कला कार्यानुभव व्यवसाय शिक्षणातंर्गत ‘प्रदूषण मुक्त’ दिवाळी साजरी करण्यासाठी सामाजिक संदेश देणारे भेटकार्ड व कागदी ओरिगामी आकाशकंदील विद्यार्थ्यांनी तयार केले त्या प्रदर्शनाचे शुभारंभ शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा जोगळेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

विद्यार्थी वाचनापासून दुरावला जाऊ नये या उद्देशाने शासन ‘महावाचन’, ‘वाचन प्रेरणा दिन’ यासारखे उपक्रम राबविते. त्याच धर्तीवर नेरळ विद्या भवन मार्फत मे महिन्याच्या सुट्टीत राबविलेल्या “घरोघरी ग्रंथालय” या योजनेस पालकांनी देखील अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास पूरक अवांतर वाचनाची आवड निर्माण झाली असून उपस्थिती वाढण्यास मदत झाली आहे. विद्यार्थ्यांनी आपली सुट्टी मोबाईलच्या भासमान जगापासून दूर राहून तसेच फटाके विरहित ‘प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी व्हावे या उद्देशाने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी दिवाळी अंक वितरित करण्यात आले असल्याचे प्रबोधन दूत सचिन अभंगे यांनी सांगितले.
सदर सुबोध ग्रामीण अंक सुट्टीपूर्वी दिवाळी पूर्वसंध्येला उपलब्ध करून दिल्याबद्दल छात्र प्रबोधनचे संपादक महेंद्रभाई सेठिया, मानद संपादक शैलजा देशमुख, कार्यकारी संपादक शिल्पा कुलकर्णी, वितरण व्यवस्थापक ज्योतीताई चौधरी, प्रकल्प समन्वयक शुभदा कुलकर्णी यांचे शाळेच्या वतीने सेवाज्येष्ठ शिक्षक नामदेव ढवळे यांनी आभार व्यक्त केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अनुक्रमे मंगेश थोरवे, अनुराधा मुरकुटे, संजय चव्हाण, एकनाथ बुरूड, विद्या भुसाळ, पंचशिला जाधव, विकास पाटील, महेश अभंगे यांनी विशेष परिश्रम घेतले.







