ईश्वर्जुन फाउंडेशन आणि कर्जत प्रेस असोसिएशनचा माणुसकी जपणारा सामाजिक उपक्रम
दिव्यांग समीरला व्हीलचेअरची भेट
दीपक बोराडे | नेरळ:
दिवाळीचा सण म्हणजे आनंद, प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचा उत्सव! मात्र, समाजातील वंचित आणि गरजू घटकांपर्यंतही या सणाचा आनंद पोहोचावा, या सामाजिक जाणिवेतून ईश्वर्जुन फाउंडेशन, कल्याण आणि कर्जत प्रेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील नांगुर्ले आणि पळसदरी आदिवासी वाड्यांमध्ये दिवाळीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कपडे, दिवाळी फराळ, मिठाई, फटाके, बेडशीट, ब्लँकेट आणि विविध भेटवस्तूंचे वाटप करून आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते अपघातामुळे अपंगत्व आलेल्या समीर वाघमारे याला देण्यात आलेली व्हीलचेअर. कार्यक्रमाची सुरुवात समीरला व्हीलचेअर प्रदान करून करण्यात आली. त्यानंतर आदिवासी महिला, पुरुष आणि लहान मुलांना दिवाळी साहित्याचे वाटप करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, फराळ आणि स्नेहभोजनाच्या माध्यमातून वाडीतील ग्रामस्थांनी दिवाळीचा आनंद अनुभवला.

आदिवासी आणि वंचित घटकांनाही सण-उत्सवांचा आनंद घेता यावा, त्यांच्याशी आपुलकीचे नाते निर्माण व्हावे, या उद्देशाने दोन्ही संस्थांकडून गेल्या अनेक वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. केवळ भेटवस्तूंचे वाटप नव्हे, तर समाजातील गरजू बांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा माणुसकीचा धागा या उपक्रमातून जपला जात आहे.
कार्यक्रमाला ईश्वर्जुन फाउंडेशनच्या अध्यक्षा माधुरी बुधरानी यांचे कर्जत प्रेस असोसिएशनचे सल्लागार दीपक बोराडे आणि भूषण प्रधान यांनी स्वागत केले. असोसिएशनचे अध्यक्ष कैलास म्हामले यांनी प्रास्ताविक केले, तर आदिवासी नेते सोमनाथ वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी ईश्वर्जुन फाउंडेशनच्या अध्यक्षा माधुरी बुधरानी, हरेश बुधरानी, मनीका माटा, दृष्टि माटा, ॲड. हितेश जेसवानी, प्रा. भारत खत्री, प्रा. सोनी नरवानी, प्रा. लवीना मंगतानी, करुणा मेवलानी आदी उपस्थित होते.
कर्जत प्रेस असोसिएशनचे सल्लागार दीपक बोराडे, किशोर गायकवाड, भूषण प्रधान, अध्यक्ष कैलास म्हामले, सचिव रामदास माळी, कार्याध्यक्ष संदेश साळुंखे, उपाध्यक्ष महेश भगत, सहखजिनदार नरेश कोळंबे, सदस्य प्रथमेश कुडेकर, गणेश लोट तसेच ग्रामस्थ नंदकुमार धामणसे, पारस कदम, चंद्रकांत पवार, अविनाश म्हामले आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळीच्या दिव्यांनी घर उजळते; पण माणुसकीच्या कृतीने आयुष्य उजळते, याचा प्रत्यय नांगुर्ले आणि पळसदरी येथील या उपक्रमातून आला. सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी बांधवांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलविणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.







