कळंब येथे आंदोलनाचा इशार
पोशीर धरणाचा मुद्दा पेटला
सतिश पाटील | कळंब:
कर्जत तालुक्यातील प्रस्तावित पोशीर धरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शिवराम बदे यांनी पोशीर धरणाबाबत केलेल्या विधानामुळे धरणग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहेत.
शिवराम बदे यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी पोशीर धरणग्रस्त शेतकरी आता थेट रस्त्यावर उतरणार असून, कळंब येथील नाक्यावर निदर्शने करण्याचा निर्णय पोशीर धरण हटाव समितीने घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका पक्षप्रवेश कार्यक्रमात शिवराम बदे यांनी पोशीर धरणाला केवळ ठरावीक लोकांचाच विरोध असून, इतर लोकांचा या प्रकल्पाला विरोध नाही, तर त्यांचा पाठिंबा असल्याचे विधान केले होते. तसेच शेतकऱ्यांना मोबदला आणि नोकऱ्या हवे असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
मात्र, बदे यांच्या या विधानामुळे पोशीर धरणाविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, हा लढा केवळ मोबदला किंवा नोकऱ्यांसाठी नसून आपल्या जमिनी, शेती, घरे, गावांचे अस्तित्व आणि येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याच्या रक्षणासाठी आहे.
एकीकडे पोशीर धरण हटावचा नारा देत शेतकरी आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे धरणाला काही मोजक्या लोकांचाच विरोध असल्याचे विधान केले जात असल्याने शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
दरम्यान, काल झालेल्या धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या बैठकीत या विधानाचा तीव्र निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कळंब येथील नाक्यावर निदर्शने करून शिवराम बदे यांच्या विधानाचा जाहीर निषेध करण्यात येणार असल्याचे पोशीर धरण हटाव समितीने सांगितले आहे.







