श्रीकांत खुपेरकर | मुंबई:
काळ बदलतो, चेहऱ्यांवर वयाच्या खुणा उमटतात; मात्र जुनी मैत्री आणि कामाच्या ठिकाणच्या आठवणी कधीही पुसल्या जात नाहीत. याचा प्रत्यय रविवारी, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सांताक्रूझ येथील विलिंग्डन कॅथोलिक जिमखाना येथे मिड-डे इन्फोमीडिया लिमिटेडच्या माजी सहकाऱ्यांच्या २६ वर्षांनंतर झालेल्या स्नेहमेळाव्यात आला.
मिड-डे इन्फोमीडिया लिमिटेडचे माजी मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) मृगांक बिपिनचंद्र कपाडिया यांनी या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. सुमारे २५ दिवसांपूर्वी त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून सुमारे २६ वर्षांपूर्वी कंपनीच्या अकाउंट्स आणि प्रशासन विभागात त्यांच्यासोबत काम केलेल्या माजी सहकाऱ्यांना एकत्र येण्याचे निमंत्रण दिले. या निमंत्रणामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि सर्वांनी उत्साहाने उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली. अनेक जण आता आजी-आजोबा झाले असले तरी जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा भेटण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.

दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या या मेळाव्यात सर्वांनी एकमेकांची आस्थेने विचारपूस केली. कुटुंबातील सदस्य आणि आयुष्यातील घडामोडींची माहिती एकमेकांना दिली. मिड-डेमधील कामाच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देतानाच आता आपल्यात नसलेल्या सहकाऱ्यांचीही आठवण काढण्यात आली. आनंद, भावूक क्षण आणि जुन्या आठवणींनी वातावरण भारावून गेले होते. वय वाढले असले तरी जुन्या मैत्रीतील आपुलकी आणि जिव्हाळा आजही कायम असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.
त्या काळातील कामाच्या वातावरणाची आठवण सांगताना विलास पारसेकर यांनी कपाडिया यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय असल्याचे सांगितले. त्यांची समजूतदार कार्यपद्धती, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन यामुळे कर्मचाऱ्यांना आत्मविश्वासाने काम करता आले.
या मेळाव्यातील विशेष क्षण म्हणजे मिड-डे इन्फोमीडिया लिमिटेडचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक तारिक अन्सारी यांनी बाली येथून व्हिडिओ कॉलद्वारे सहभाग घेतला. त्यांनी प्रत्येक माजी कर्मचाऱ्याशी स्वतंत्रपणे संवाद साधला. अनेक वर्षांनंतरही अन्सारी यांना प्रत्येकाचे नाव आठवत असल्याने उपस्थितांना विशेष आनंद झाला. त्यांच्या या कृतीने सर्वांना भावूक केले आणि कंपनीसोबतच्या जुन्या संबंधांना दिलेली ही विशेष दाद असल्याची भावना व्यक्त झाली.
या स्नेहमेळाव्याला एम. बी. कपाडिया, संजीवा सॅलियन, टी. एल. अँटोनी, प्रकाश सावंत, रमेश कामत, मुस्तफा सैफी, अजित ठक्कर, विलास पारसेकर, लतीफ शेख, गोविंद गायकवाड, अनिल सावंत, श्रीकांत खुपेरकर, अर्चना पाटणकर, मेघना प्रधान, जेॅनेट् फर्नांडेस , अलका सोलंकी आणि रोसी क्रूझ उपस्थित होते. केशवर पोस्टमास्टर, प्रदीप पावसकर यांची प्रकृती ठीक नसल्याने ते या स्नेहमेळाव्याला उपस्थित राहू शकले नाहीत.
हसरे चेहरे, छायाचित्रे आणि पुन्हा भेटण्याच्या आश्वासनांसह या स्नेहमेळाव्याची सांगता झाली. भविष्यातही असे स्नेहमेळावे आयोजित करून जुनी मैत्री कायम जपण्याची इच्छा उपस्थितांनी व्यक्त केली.








