प्रकल्प रद्द करण्यासाठी नागरिकांना आवाहन
पर्यावरण संरक्षणासाठी सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांचा पुढाकार
पंकेश जाधव | कडाव, कर्जत:
कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरंट पंप्ड स्टोरेज प्रकल्पाविरोधात जनमत जागृत करण्यासाठी कडाव येथे जनजागृती अभियान राबविण्यात आले. निसर्ग, पर्यावरण आणि स्थानिक नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या अभियानात मुंबईहून आलेल्या विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी तसेच स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.
या जनजागृती अभियानांतर्गत सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी कडाव परिसरातील घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या. प्रस्तावित टोरंट प्रकल्पामुळे पर्यावरणावर होऊ शकणारे संभाव्य परिणाम, जंगल आणि नैसर्गिक संपत्तीची हानी, स्थानिक जैवविविधतेसमोरील धोके तसेच परिसरातील निसर्गसंपदेच्या संरक्षणाची गरज याबाबत नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली.
प्रकल्पाच्या संभाव्य परिणामांविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून या विषयावर व्यापक जनमत तयार करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. विकासाच्या संकल्पनेत पर्यावरण संरक्षण, स्थानिक नागरिकांचे हित आणि निसर्गाचा समतोल यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याची भूमिका अभियानातील सहभागी प्रतिनिधींनी मांडली.
“विकासाच्या नावाखाली निसर्गाचा विनाश आम्हाला मान्य नाही. कर्जतचा निसर्ग, सह्याद्रीचे जंगल आणि पर्यावरण वाचवण्यासाठी टोरंट प्रकल्प रद्द झालाच पाहिजे!” असे ठाम आवाहन यावेळी करण्यात आले.
कर्जत तालुक्याची ओळख ही येथील डोंगररांगा, हिरवीगार जंगले, नद्या, नैसर्गिक जलस्रोत आणि समृद्ध पर्यावरणामुळे आहे. या निसर्गसंपदेचे संरक्षण करणे ही केवळ शासनाचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे मत अभियानातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
प्रस्तावित प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांना संपूर्ण माहिती मिळणे, पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास होणे आणि नागरिकांच्या आक्षेपांना योग्य न्याय मिळणे आवश्यक असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

कडाव येथे आयोजित या जनजागृती अभियानाप्रसंगी चेतन पवाळी, फुलाजी पवार, दशरथ मुने, पत्रकार पंकेश जाधव, देवा पवार आणि निलेश धुळे यांच्यासह मुंबईहून आलेल्या विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

टोरंट प्रकल्पाविरोधातील जनजागृती अधिक व्यापक करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन पर्यावरण संरक्षणाच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कर्जत तालुक्याच्या नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी पर्यावरणाचा समतोल टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने या अभियानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. टोरंट प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.








