महावीर पेठेतील गल्लीत महिंद्रा XUV आढळली
वाहनात तंबाखूच्या गोण्या, दुसऱ्या वाहनाची नंबर प्लेट असल्याची माहिती
नरेश जाधव | कर्जत, रायगड:
कर्जत शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत नागरिकांना धडक दिल्यानंतर महिंद्रा XUV गाडी सोडून चालक फरार झाल्याची घटना बुधवारी, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिस ग्राउंड परिसरातून सुरू झालेल्या या प्रकारानंतर महावीर पेठेतील एका गल्लीमध्ये संबंधित वाहन आढळून आले. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता, त्यामध्ये तंबाखूच्या गोण्या आढळल्या. या मालामध्ये गुटखा असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, वाहनाला दुसऱ्या गाडीची नंबर प्लेट लावण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. या घटनेमुळे कर्जत शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वाहनचालक भरधाव वेगाने महावीर पेठ परिसराच्या दिशेने जात होता. या दरम्यान एका वृद्ध महिलेसह अन्य एका नागरिकाला वाहनाची धडक बसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर चालकाने महावीर पेठेतील एका अरुंद गल्लीत गाडी सोडून पलायन केले. स्थानिक तरुणांनी वाहनाचा पाठलाग केला असता, गाडी आढळून आली; मात्र चालक घटनास्थळावरून पसार झाला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक मीनल शिंदे यांनी परिसरात शोधमोहीम राबवली. इमारती आणि गल्लीबोळांत संशयित चालकाचा शोध घेण्यात आला; मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही.

दरम्यान, पोलिसांनी एमएच ०५ बीसी ८०५५ या क्रमांकाच्या महिंद्रा XUV गाडीची तपासणी केली असता, त्यामध्ये तंबाखूच्या गोण्या आढळून आल्या. वाहनाला लावलेली नंबर प्लेट दुसऱ्या वाहनाची असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे वाहनाची ओळख, त्यातील मालाचे स्वरूप आणि संबंधित चालकाच्या भूमिकेबाबत तपासातून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. घटनास्थळी पंचनामा करून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या कारवाईत वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी चव्हाण आणि नागे यांनीही सहकार्य केले.

वाहन सोडून फरार झालेला चालक कोण? वाहनाला दुसऱ्या गाडीची नंबर प्लेट का लावण्यात आली होती? गाडीत आढळलेल्या तंबाखूच्या गोण्यांमध्ये गुटखा होता का? असे प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत. फरार चालकाचा शोध सुरू असून, पोलिस तपास आणि अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर या प्रकरणातील अधिक तपशील स्पष्ट होणार आहेत.







