अमेरिका-चीनप्रमाणे झाडांचे ट्रान्सप्लांटेशन करण्याची मुख्यमंत्र्यांना किरण ठाकरे यांची विनंती
विरोधकांचे काम विरोध करणे, ते आपले काम करीत आहेत
आनंद सकपाळ | नेरळ:
कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात प्रस्तावित टोरंट पॉवरच्या प्रकल्पावरून पर्यावरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रकल्पाला विरोध करण्याचा आपला उद्देश नसून विकासाला चालना मिळावी; मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असेल, तर पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा, अशी भूमिका किरण ठाकरे यांनी मांडली आहे. अमेरिका आणि चीनसारख्या देशांमध्ये मोठी झाडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्याचे तंत्र वापरले जाते. त्याच धर्तीवर साई डोंगर परिसरातील मौल्यवान वृक्षांचे ट्रान्सप्लांटेशन (वृक्ष पुनर्स्थापना) करण्याची विनंती मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
साई डोंगर परिसरात प्रस्तावित असलेल्या टोरंटच्या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर विकासकामे होणार असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यासाठी होणारी संभाव्य वृक्षतोड आणि त्याचा जैवविविधतेवर होणारा परिणाम याबाबत पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विकास आणि पर्यावरण यांच्यात समतोल साधण्याची गरज असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले.‘विकास थांबवायचा नाही; मात्र विकासाच्या नावाखाली निसर्गाची अपरिमित हानीही होता कामा नये,’ अशी भूमिका घेत, प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान पर्यावरणपूरक उपाययोजनांना प्राधान्य देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, टोरंट प्रकल्पाच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. प्रकल्पाला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात असताना, “विरोधकांचे काम विरोध करणे असल्याने ते त्यांचे काम करीत आहेत,” अशी प्रतिक्रिया किरण ठाकरे यांनी दिली. मात्र केवळ विरोध किंवा समर्थन यापलीकडे जाऊन प्रकल्पामुळे होणारे पर्यावरणीय परिणाम, स्थानिक हितसंबंध आणि विकासाची गरज यांचा समतोल साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
साई डोंगर हा सह्याद्रीच्या नैसर्गिक पट्ट्यातील महत्त्वाचा परिसर मानला जात असून, या भागातील जंगल, वन्यजीव आणि जलस्रोतांच्या संरक्षणाचा मुद्दा सातत्याने चर्चेत आहे. त्यामुळे प्रस्तावित प्रकल्पाला आवश्यक त्या परवानग्या आणि पर्यावरणीय निकषांचे पालन करूनच पुढे नेण्यात यावे, तसेच शक्य तिथे वृक्षतोड टाळण्यासाठी पर्यायी तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी मागणी आता पुढे येत आहे.
विकास आणि पर्यावरण हे परस्परविरोधी नसून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दोन्हींचा समतोल साधता येऊ शकतो. साई डोंगरातील वृक्षसंपदा वाचविण्यासाठी वृक्षांचे ट्रान्सप्लांटेशन हा पर्याय गांभीर्याने विचारात घ्यावा, अशी भूमिका किरण ठाकरे यांनी मांडली आहे.







