वनराई बंधाऱ्यांमुळे १४५० ग्रामस्थांना दिलासा
मोतीराम पादीर | कर्जत:
महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत असताना कर्जत तालुक्यातील दुर्गम आदिवासी पट्ट्यात युनायटेड वे मुंबई संस्थेने जलसंधारणाचे मोलाचे काम केले आहे.
संस्थेचा ‘जल संजीवनी’ प्रकल्प कर्जत तालुक्यातील खांडस,पाथरज, अंभेरपाडा,नांदगाव, ओलमण आणि वारे या ६ ग्रामपंचायतीमधील ४३ गावांमध्ये राबविला जात आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पिण्याचे पाणी, शेतीसाठी संरक्षित सिंचन, शाश्वत शेती आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे हा आहे.

लोकसहभागातून वनराई बंधारे
याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून डोंगरपाडा, अंभेरपाडा, नवसूचीवाडी, ऐनाचीवाडी,चाफेवाडी, पेटारवाडी येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून गोण्यांचा वापर करून वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. तसेच जुन्या सिमेंट बंधाऱ्यांना गेट बसवून त्यांची डागडुजी करण्यात आली आहे.
संस्था आणि ग्रामपंचायतीने गोण्या उपलब्ध करून दिल्या असून पाणी वापर गट आणि महिला बचत गटाच्या पुढाकाराने ही कामे विक्रमी वेळेत पूर्ण झाली.

शेतकऱ्यांना थेट लाभ
या बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होणार असून जनावरांसाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले आहे. विशेषतः काकडी,कारली,शिरवली, दोडके यांसारख्या कमी कालावधीच्या नगदी पिकांना संरक्षित सिंचनाचा लाभ मिळत असून शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
या कामाचा लाभ ३०० पेक्षा अधिक कुटुंबातील जवळपास १४५० लोकांना होणार आहे. यामुळे शेती उत्पादनात ३० ते ३५ टक्के,वाढ होईल आणि जमिनीतील ओलावा २० ते ३० टक्क्यांनी वाढेल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.
यापूर्वी संस्थेने शेततळे, वॉटर व्हील, ठिबक सिंचन, मल्चिंग आणि चर खोदणे (ट्रेंचेस) यासारखे उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.









