उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना पत्रकारांचे निवेदन
रायगडचे वादळ न्युज नेटवर्क | कर्जत:
टोरंट जल विद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्ष तोडीस कर्जत प्रेस क्लब आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांनी तीव्र विरोध दर्शवून सदर वृक्षतोड तात्काळ थांबविण्याबाबत कर्जत उपविभागीय अधिकारी आणि कर्जत तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले, आणि सदरचे निवेदन आजच कंपनीला आणि सरकारला पाठवावे अशी पत्रकारांच्या तर्फे विनंती करण्यात आली.
पत्रकारांच्यावतीने उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ आणि तहसीलदार डॉ. धनंजय जाधव निवेदन देण्यात आली सदर निवेदनामध्ये कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात टोरंट कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. या वृक्षतोडीमुळे परिसरातील नैसर्गिक वनसंपदा, जैवविविधता, पर्यावरणीय समतोल आणि स्थानिक निसर्गसंपत्तीला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला रायगड जिल्हा हा समृद्ध वनसंपदा, डोंगररांगा, जैवविविधता आणि निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसराचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता, येथील वृक्षतोड हा केवळ स्थानिक प्रश्न नसून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत चिंतेचा विषय आहे.
विकासकामांना आमचा विरोध नसून विकासाच्या नावाखाली नैसर्गिक वनसंपत्तीचा ऱ्हास होऊ नये, ही आमची ठाम भूमिका आहे. कोणत्याही प्रकल्पाची अंमलबजावणी करताना पर्यावरणाचे संरक्षण, स्थानिक नागरिकांचे हित आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन यांना प्राधान्य दिले गेले पाहिजे.
पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडणे, जनहिताच्या विषयांवर प्रशासनाचे लक्ष वेधणे आणि पर्यावरणासारख्या सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर जागरूकता निर्माण करणे ही पत्रकारांची सामाजिक जबाबदारी आहे. याच सामाजिक जाणिवेतून कर्जत प्रेस क्लब या पत्रकारांच्या संघटनेच्या वतीने सदर वृक्षतोडीचा तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहे.
रायगड प्रेस क्लब कार्याध्यक्ष संजय मोहिते, सचिव दर्वेश पालकर, अध्यक्ष गणेश पवार, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, संजय गायकवाड, विद्यानंद ओव्हाळ, संतोष दळवी, जयवंत हाबळे, दीपक पाटील, अजय गायकवाड, मल्हार पवार, मोतीराम पादिर, अनिल गवळे, संजय अभंगे, गणेश पुरवंत, विलास श्रीखंडे, ज्ञानेश्वर बागडे आदी उपस्थित होते.







