शिवसेनेच्या बंदच्या रॅलीत पर्यावरणप्रेमींचा मोठा सहभाग
साय डोंगर, शेती आणि पेज नदीच्या संरक्षणाची मागणी
आनंद सकपाळ | नेरळ:
कर्जत तालुक्यातील साय डोंगर परिसरात प्रस्तावित टोरंट पॉवरच्या प्रकल्पाला विरोध दर्शवित उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने सोमवारी दि. २ नोव्हेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या कर्जत तालुका बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कर्जत शहरासह नेरळ, कळंब, कशेळे, कडाव तसेच ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी दुकाने व व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्यात आल्या. बंदच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीत कर्जत पर्यावरण बचाव समितीसह विविध पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेत टोरंट प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांबाबत चिंता व्यक्त केली.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष नितीन सावंत यांनी साय डोंगर आणि सह्याद्रीचे पर्यावरण वाचविण्यासाठी व्यापक जनसंवादाची गरज व्यक्त केली. विकासाला विरोध नसला तरी प्रकल्पामुळे स्थानिक गावे, शेती, पाणी आणि पर्यावरणावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच साय डोंगर परिसरातील जंगल, वृक्षतोड आणि स्थानिकांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी करत सावंत यांनी प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा सार्वजनिक करण्याची मागणी केली. प्रकल्पामुळे किती जमीन बाधित होणार, किती वृक्षांवर परिणाम होणार आणि स्थानिकांच्या शेती-पाण्यावर नेमका काय परिणाम होणार, याबाबत पारदर्शक माहिती नागरिकांसमोर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कर्जत पर्यावरण बचाव समितीचे समन्वयक अॅड. कैलास मोरे यांनीही प्रकल्पाच्या विविध बाबींवर प्रश्न उपस्थित केले. साय डोंगर परिसरातील वृक्षतोडीबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत संबंधित वृक्षतोडीची अधिकृत माहिती जाहीर करण्याची मागणी केली. तसेच प्रकल्पाच्या ट्रान्समिशन लाईन आणि इतर पायाभूत सुविधांसाठी शेतजमिनीवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचाही विचार करावा, असे त्यांनी नमूद केले. पेज नदी ही या परिसरातील महत्त्वाची जलस्रोत व्यवस्था असल्याचे सांगत नदीच्या मुख्य प्रवाहावर आणि परिसरातील गावांच्या पाणीपुरवठ्यावर प्रकल्पाचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, याची शासनाने स्पष्ट हमी द्यावी, अशी मागणी पर्यावरण बचाव समितीकडून करण्यात आली.

साय डोंगरातील जंगल, स्थानिक शेती, पाणी आणि जैवविविधता यांचे संरक्षण करताना विकासाचा मार्ग शोधण्याची गरज असल्याचा सूर बंदच्या आंदोलनातून उमटला. प्रकल्पासंदर्भातील सर्व परवानग्या, पर्यावरणीय अहवाल, वृक्षतोडीची माहिती, ट्रान्समिशन लाईनची आखणी आणि स्थानिकांवरील परिणाम याबाबत शासनाने पारदर्शक माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

कर्जत तालुका बंदच्या निमित्ताने शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पर्यावरणाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, टोरंट प्रकल्पाबाबत पुढील काळात शासन आणि स्थानिक नागरिक यांच्यातील संवादाला महत्त्व प्राप्त झाले आहे.








