टोरंट प्रकल्पासाठी वृक्षतोड; निरागस वन्यजीवांचा बळी?
३ हजार मेगावॅट प्रकल्पासाठी किती जंगल उद्ध्वस्त होणार?
वन्यजीवांचे भवितव्य काय, पर्यावरणाच्या ऱ्हासाला जबाबदार कोण?
साई डोंगरावर वृक्षतोडीचा कहर
टोरंट प्रकल्पासाठी वृक्षतोड; निरागस वन्यजीवांचा बळी?
३ हजार मेगावॅट प्रकल्पासाठी किती जंगल उद्ध्वस्त होणार?
वन्यजीवांचे भवितव्य काय, पर्यावरणाच्या ऱ्हासाला जबाबदार कोण?
आनंद सकपाळ | नेरळ:
कर्जत तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या साई डोंगर परिसरात टोरंट पॉवरच्या प्रस्तावित ३ हजार मेगावॅट पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याच्या आरोपांमुळे पर्यावरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वृक्षतोडीमुळे वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास बाधित होत असताना, आता एका वन्यप्राण्याचा मृतदेह आढळून आल्याने या प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
वृक्षतोड सुरू असलेल्या परिसरात आढळून आलेल्या वन्यप्राण्याच्या मृतदेहाचे छायाचित्र समोर आले असून, या प्राण्याचा मृत्यू वृक्षतोडीमुळेच झाला का, याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. मात्र, जंगलातील मोठ्या प्रमाणावरील मानवी हस्तक्षेपामुळे वन्यजीवांच्या अधिवासावर होणाऱ्या परिणामाची चिंता पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी का?
सह्याद्रीच्या संवेदनशील डोंगररांगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड, डोंगर उत्खनन आणि बांधकाम झाल्यास त्याचा परिणाम केवळ झाडांपुरता मर्यादित राहत नाही. जंगलावर अवलंबून असलेल्या वन्यजीवांचे अधिवास, त्यांच्या हालचालींचे मार्ग, अन्नसाखळी आणि नैसर्गिक जलस्रोत यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
एका झाडाच्या पडण्यामागे केवळ एक वृक्ष नाही, तर त्यावर अवलंबून असलेल्या असंख्य जीवांचे जगणेही जोडलेले असते. त्यामुळे साय डोंगरातील प्रस्तावित प्रकल्पासाठी नेमकी किती वृक्षतोड होणार, त्याचा वन्यजीवांवर किती परिणाम होणार आणि त्यासाठी कोणती संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आली आहे, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे.
या जंगलातील वन्यजीवांचे भवितव्य काय?
साय डोंगर परिसरात विविध प्रकारचे वन्यजीव आणि पक्ष्यांचा अधिवास असल्याचे पर्यावरणप्रेमी सांगतात. जंगलाचा मोठा भाग बाधित झाल्यास हे प्राणी आपल्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडण्यास भाग पडू शकतात. त्यातून मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. वृक्षतोडीच्या काळात वन्यजीवांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे का? कोणते प्राणी या परिसरात आढळतात? त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात आली आहे? वृक्षतोडीपूर्वी आणि नंतरचा जैवविविधता अभ्यास काय सांगतो? या प्रश्नांची उत्तरे संबंधित यंत्रणांनी द्यावीत, अशी मागणी पुढे येत आहे.

‘किती वृक्षतोड?’ याचा स्पष्ट हिशोब द्या
टोरंटच्या प्रस्तावित ३ हजार मेगावॅट प्रकल्पासाठी साय डोंगर परिसरात किती क्षेत्र बाधित होणार, किती झाडे तोडण्यास परवानगी आहे आणि प्रत्यक्षात किती वृक्षतोड झाली, याचा स्पष्ट हिशोब शासनाने जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. परवानगीतील संख्या आणि प्रत्यक्ष वृक्षतोड यामध्ये तफावत आहे का? वृक्षतोडीची नोंद कशी केली जाते? प्रत्येक झाडाला क्रमांक देण्याची प्रक्रिया कशी पार पडते? याबाबतही पारदर्शकता आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मातीची धूप, जलस्रोत आणि जैवविविधतेची चिंता
मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यास मातीची धूप वाढणे, डोंगर उतार अस्थिर होणे, पावसाचे पाणी वाहून जाण्याचे प्रमाण बदलणे आणि स्थानिक जलस्रोतांवर परिणाम होण्याची शक्यता असते. साय डोंगरासारख्या डोंगराळ आणि पावसाळी परिसरात या परिणामांचा स्वतंत्र अभ्यास करणे आवश्यक असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
त्यामुळे केवळ प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचा विचार न करता जंगल, जलस्रोत, वन्यजीव, स्थानिक समाज आणि भविष्यातील पर्यावरणीय परिणाम यांचा एकत्रित विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणार कोण?
साय डोंगरातील वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर आता एकच प्रश्न उपस्थित होत आहे—विकास आणि पर्यावरण यांच्यात समतोल साधण्याची जबाबदारी कोणाची? वन्यजीवांचा मृत्यू वृक्षतोडीमुळे झाला आहे की अन्य कारणाने, याची वनविभागाने तातडीने चौकशी करावी. मृत प्राण्याचे शवविच्छेदन, घटनास्थळाची पाहणी आणि आवश्यक असल्यास वन्यजीव तज्ज्ञांच्या माध्यमातून तपास करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. पर्यावरण व वन्यजीवांचे संरक्षण हीच खरी विकासाची दिशा मानून साय डोंगरातील वृक्षतोड, वन्यजीवांचा अधिवास आणि प्रस्तावित प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांबाबत शासनाने पारदर्शक माहिती जनतेसमोर ठेवावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. कारण प्रश्न केवळ आज एका वन्यप्राण्याचा मृतदेह आढळण्याचा नाही; उद्याच्या काळात या जंगलातील किती निरागस जीवांना आपला अधिवास गमवावा लागणार, हा अधिक मोठा प्रश्न आहे.







