अमृतसर एक्सप्रेसमधील सीलबंद अमूल कॉफीच्या डब्यात अळ्या
उंदरांनीही कुरतडला डबा; रेल्वे कॅन्टीनचा धक्कादायक प्रकार
कर्जत तालुक्यातील रेल्वे प्रवाशांचा धक्कादायक अनुभव
रायगडचे वादळ न्यूज नेटवर्क | कर्जत:
रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित करणारी धक्कादायक घटना अमृतसर ते बांद्रा टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या अमृतसर एक्सप्रेसमध्ये (गाडी क्रमांक 12926) समोर आली आहे. या एक्सप्रेसमधील कॅन्टीनमधून खरेदी केलेल्या अमूल कुल कॉफीच्या सीलबंद डब्यात अळ्या आणि किडी आढळून आल्याने प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, संबंधित कॉफीचा डबा उंदरांनी कुरतडल्याचेही निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे रेल्वेतील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा, साठवणुकीचा आणि गुणवत्तेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील कडाव व भालिवडी येथील प्रशांत गुरव, प्रदीप गंगावणे, वैभव पवार, सुनील माळी, ज्ञानेश्वर गुरव आदी रेल्वे प्रवासी अमृतसर येथून बांद्रा टर्मिनसकडे अमृतसर एक्सप्रेस (12926) या गाडीने प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान त्यांनी एक्सप्रेसमधील कॅन्टीनमधून अमूल कुल कॉफीचा एक डबा खरेदी केला होता. मात्र, कॉफीचे सेवन करीत असताना त्यामध्ये अळ्या व किडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. इतकेच नव्हे, तर सदर डब्याच्या बाहेरील भागावर उंदरांनी कुरतडल्याच्या खुणाही दिसून आल्या.
सीलबंद खाद्यपदार्थाच्या डब्यात अशा प्रकारे अळ्या व किडी आढळून आल्याने संबंधित प्रवाशांना प्रचंड धक्का बसला. प्रवासादरम्यान विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या धक्कादायक प्रकाराबाबत संबंधित प्रवाशांनी तातडीने अमृतसर एक्सप्रेसमधील कॅन्टीन गाठून तेथील व्यवस्थापकाची भेट घेतली. त्यांनी कॉफीच्या डब्यात आढळलेल्या अळ्या व किडी प्रत्यक्ष दाखवून संपूर्ण प्रकार व्यवस्थापकाच्या निदर्शनास आणून दिला. मात्र, यावर कॅन्टीन व्यवस्थापकाने “पॅकबंद डब्यातील वस्तूंची जबाबदारी आमची नाही,” असे उत्तर दिल्याचे संबंधित प्रवाशांनी सांगितले.
व्यवस्थापकाच्या या उत्तरामुळे प्रवाशांचे समाधान होण्याऐवजी त्यांच्या संतापात आणखी भर पडली. रेल्वे कॅन्टीनमधून प्रवाशांना खाद्यपदार्थ विक्री केले जात असताना त्या पदार्थांची गुणवत्ता, मुदत, साठवणूक आणि स्वच्छता तपासण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान हजारो प्रवासी कॅन्टीनमधून खाद्यपदार्थ व पेयपदार्थ खरेदी करतात. अशा परिस्थितीत प्रवाशांना विक्री करण्यात येणारे खाद्यपदार्थ सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, सीलबंद कॉफीच्या डब्यात अळ्या व किडी आढळणे आणि डबा उंदरांनी कुरतडलेला असणे ही बाब अत्यंत गंभीर असून, याकडे केवळ किरकोळ तक्रार म्हणून पाहून चालणार नाही.
या संपूर्ण प्रकरणाची रेल्वे प्रशासन, संबंधित रेल्वे विभाग आणि IRCTC व्यवस्थापनाने गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी. संबंधित कॉफीच्या डब्याची तसेच त्याच्या बॅच क्रमांकाची आणि उत्पादनाच्या गुणवत्तेची तपासणी करावी. रेल्वे कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांच्या साठवणुकीची व्यवस्था तपासावी आणि दोषी आढळणाऱ्या संबंधित विक्रेते, पुरवठादार तसेच उत्पादकांवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संबंधित रेल्वे प्रवाशांनी केली आहे.
प्रवाशांच्या जीवाशी आणि आरोग्याशी संबंधित अशा गंभीर प्रकारांकडे रेल्वे प्रशासन किती गांभीर्याने पाहणार? खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची जबाबदारी झटकण्याऐवजी प्रवाशांना सुरक्षित आणि स्वच्छ खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणा कधी स्वीकारणार? असा संतप्त सवाल या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.







