विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची शिकवण
आनंद सकपाळ | नेरळ:
कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भागातील झुगरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पर्यावरण संवर्धन, वृक्षांचे महत्त्व, पाणी बचत, अन्नाची नासाडी टाळणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

झुगरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण दिले जाते. दुर्गम भागातील ही शाळा असूनही येथे विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट टीव्ही, संगणक यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून शाळेच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’चा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न
यावेळी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधताना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या दैनंदिन जीवनात घेतलेल्या छोट्या-छोट्या निर्णयांचा गाव, समाज आणि देशाच्या पर्यावरणावर परिणाम होतो, याची जाणीव करून देण्यात आली. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी तीन संकल्प करण्याचे ठरविले. त्यामध्ये पाण्याची नासाडी करणार नाही, अन्न वाया घालवणार नाही तसेच शाळेच्या परिसरातील झाडांची निगा राखून परिसर स्वच्छ ठेवू, असे संकल्प विद्यार्थ्यांनी केले.

विद्यार्थ्यांना पुस्तकांसह शैक्षणिक साहित्याची भेट
विद्यार्थ्यांना विविध पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य देण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हाताळता येतील आणि सोप्या पद्धतीने विविध विषयांची माहिती मिळेल, अशा स्वरूपाच्या इंटरॅक्टिव्ह पुस्तकांचाही यामध्ये समावेश होता.
‘ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांच्याकडे नाही, त्यांच्यातील दरी कमी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येण्याची गरज आहे. दुर्गम भागातील शाळांमध्ये वेळ देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आणि भवितव्याला हातभार लावणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,’ असे मत एक भारत हम भारत मैत्री बोध परिवारच्या राष्ट्रीय प्रमुख अनुराधा गोखले यांनी व्यक्त केले. पुणे आणि मुंबई येथील ‘एक भारत हम भारत’च्या स्वयंसेवकांनी शैक्षणिक साहित्य व भेटवस्तू उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील प्रत्येक नागरिकाने एकमेकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविला, तरच समाजाच्या सर्वांगीण विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल, असा संदेश त्यांनी दिला.
या उपक्रमावेळी अनुराधा गोखले, मयुर माळी, केंद्रप्रमुख अमोल चोळके, मुख्याध्यापक रवी काजळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप सावळा, पालक प्रतिनिधी तातू पारधी, पदवीधर शिक्षिका राजश्री पाटील, शिक्षक जनार्धन निरगुडा, लक्ष्मण पादीर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शिक्षणासोबतच पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणारा हा उपक्रम ठरला.







