स्वखर्चाने बसवली संरक्षक रेलिंग
पंचशील नगरमधील नागरिकांची गैरसोय दूर; ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना मिळाला दिलासा
दिगंबर चंदने | माथेरान:
निवडणुकीच्या काळात नागरिकांना विविध विकासकामांची आश्वासने देणारे अनेक लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर मात्र दिलेला शब्द विसरतात. मात्र, माथेरान नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक सचिन दाभेकर यांनी निवडणुकीत दिलेले आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण करून नागरिकांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. पंचशील नगर परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी स्वतःच्या खर्चातून लोखंडी संरक्षक रेलिंग बसवून दिली आहे.
प्रभाग क्रमांक ५ मधील पंचशील नगर येथे नागरिकांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः परिसरातील काही ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने रेलिंगची आवश्यकता होती. रेलिंग नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच लहान मुलांना ये-जा करताना धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे या ठिकाणी संरक्षक रेलिंग बसविण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती.
निवडणुकीच्या काळात नागरिकांशी संवाद साधताना नगरसेवक सचिन दाभेकर यांनी या ठिकाणी संरक्षक रेलिंग बसवून देण्याचे आश्वासन दिले होते. निवडून आल्यानंतर त्यांनी या आश्वासनाचा विसर न पडू देता प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. विशेष म्हणजे, नगरपरिषदेच्या निधीची किंवा प्रशासकीय प्रक्रियेची वाट न पाहता त्यांनी स्वखर्चातून लोखंडी रेलिंग बसवून नागरिकांची दीर्घकाळची मागणी पूर्ण केली.
रेलिंग बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ये-जा करताना सुरक्षितता वाढल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून केवळ आश्वासने देणे महत्त्वाचे नसून, दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हीच खरी लोकसेवा असल्याचे सचिन दाभेकर यांच्या या उपक्रमातून दिसून येत आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित छोट्या-छोट्या समस्या स्वतःच्या पुढाकाराने सोडविण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या कामामुळे प्रभाग क्रमांक ५ मध्ये “शब्द देणारा नव्हे, तर शब्द पाळणारा नगरसेवक” अशी चर्चा सुरू झाली असून, स्थानिक नागरिकांनी नगरसेवक सचिन दाभेकर यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे इतर लोकप्रतिनिधींनीही नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







