छताचा स्लॅब कोसळून रुग्ण जखमी
प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संतापाचा स्फोट
ओमकार नागावकर | अलिबाग:
जिथे रुग्ण जीव वाचवण्यासाठी दाखल होतात, त्याच जिल्हा सामान्य रुग्णालयात आता स्वतःचा जीव वाचवण्याची वेळ रुग्णांवर आली आहे का? पहाटे उपचार सुरू असताना सर्जिकल वॉर्डमधील छताचा स्लॅब थेट रुग्णाच्या डोक्यावर कोसळल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचा आरोप होत असून, प्रशासनाच्या हलगर्जी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
श्रीवर्धन येथील ४४ वर्षीय रुग्णावर उपचार सुरू असतानाच अचानक छताचा मोठा भाग कोसळला. आधीच अपघातामुळे जखमी असलेल्या या रुग्णाला रुग्णालयातच दुसरा जबर धक्का बसला. घटनेनंतर प्रशासनाने धावपळ सुरू केली; मात्र दुर्घटना घडण्यापूर्वी इमारतीची सुरक्षितता तपासण्याची जबाबदारी नेमकी कुणाची होती, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत जखमी रुग्णाची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांसह संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत रुग्णालयातील सुरक्षेच्या गंभीर प्रश्नावर कठोर भूमिका घेतली. फायर ऑडिट, इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट, अपुऱ्या मनुष्यबळाची चौकशी आणि निकृष्ट दर्जाच्या कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, प्रदीप नाईक, सुरेश घरत, ॲड. परेश देशमुख, संजना कीर, ॲड. ऋषीकेश माळी, ॲड. अश्विनी ठोसर, नागेश कुलकर्णी, अंजली ठाकूर, दत्ता ढवळे, संदीप ढवळे, ॲड. किशोर हजारे, आनंद पाटील, संतोष गुरव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोट्यवधींचा खर्च… पण रुग्णांच्या जीवाची किंमत शून्य?
रुग्णालयाच्या दुरुस्तीवर लाखो-कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचे वारंवार सांगितले जाते. तरीही छत कोसळते, पीओपी गळते आणि रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरूच राहतो. मग हा निधी नेमका गेला कुठे? दर्जाहीन कामांना संरक्षण देणारे कोण? असे प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेत.

धक्कादायक प्रकार : एवढी गंभीर घटना… तरी पोलिसांना माहितीच नाही?
रुग्ण जखमी झाल्यानंतर तब्बल काही तास संबंधित पोलिस यंत्रणेलाही घटनेची माहिती मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. इतक्या गंभीर दुर्घटनेची माहिती वेळेत का देण्यात आली नाही? माहिती दडपण्याचा प्रयत्न झाला का? या संशयाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
एकाच दिवशी दोनदा छत कोसळले; तरीही प्रशासनाला जाग नाही
पहाटे रुग्ण जखमी झाल्यानंतर दुपारच्या सुमारास त्याच परिसरात पुन्हा स्लॅबचा भाग कोसळला. सुदैवाने त्या वेळी कोणी नसल्याने मोठी जीवितहानी टळली; मात्र सलग दोन वेळा घडलेल्या या घटना रुग्णालयाच्या संरचनात्मक सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या ठरत आहेत.
‘रुग्णालय’ की ‘मृत्यूचा सापळा’?
सरकारी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या नागरिकांना जर छत कोसळण्याच्या भीतीखाली उपचार घ्यावे लागत असतील, तर ही केवळ दुर्घटना नसून संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाची गंभीर घंटा असल्याची भावना व्यक्त होत आहे. दोषींवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई, संपूर्ण इमारतीचे स्वतंत्र स्ट्रक्चरल ऑडिट आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.
रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला हा बेदरकार खेळ तातडीने थांबवला गेला नाही, तर जनतेचा संताप रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.







