“भरतशेठ गोगावले यांची पालकमंत्रीपदी निवड हा विजय शिवसेनेचा, भगव्याचा आणि रायगडच्या स्वाभिमानाचा” – आमदार महेंद्रशेठ थोरवे
प्रथमेश कुडेकर | कर्जत:
रायगड जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री तथा नामदार भरतशेठ गोगावले यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा कर्जत तालुक्यातील पोसरी येथील शिवतीर्थ हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात भरतशेठ गोगावले यांच्या पालकमंत्रीपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी आपल्या मनोगतात भरतशेठ गोगावले यांच्या पालकमंत्रीपदासाठी झालेल्या राजकीय संघर्षाचा उल्लेख केला. संघर्षशील नेतृत्वाला विविध प्रकारच्या राजकीय दबावतंत्रातून रोखण्याचे प्रयत्न झाले; मात्र ज्यांच्या पाठीशी संघर्षाची ताकद आणि जनतेचा विश्वास असतो, अशा नेतृत्वाला कोणीही रोखू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

“छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायगडावर स्वराज्याची राजधानी उभारली, त्या ऐतिहासिक आणि स्वाभिमानी रायगड जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्री मिळणे ही अभिमानाची बाब आहे. भरतशेठ गोगावले यांची पालकमंत्रीपदी निवड हा केवळ एका व्यक्तीचा विजय नसून हा शिवसेनेचा, भगव्याचा आणि रायगडच्या स्वाभिमानाचा विजय आहे,” असे प्रतिपादन आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार महेंद्रशेठ दळवी तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी भरतशेठ गोगावले यांचे अभिनंदन करत रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्या पालकमंत्रीपदाचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.

शिवसेना उपनेते तथा माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनीही आपल्या भाषणातून गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या राजकीय संघर्षाचा उल्लेख केला. गेल्या महिनाभरात या संघर्षाला निर्णायक वळण मिळाले आणि अखेर भरतशेठ गोगावले यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले, असे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी आपल्या नेहमीच्या मिश्कील शैलीत उपस्थितांशी संवाद साधला. “माझ्या पालकमंत्रीपदासाठी ज्यांनी देव पाण्यात ठेवले होते, त्या सर्वांचा हा सत्कार सोहळा आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला.

रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक जनता आपल्या सोबत असल्याचा विश्वास व्यक्त करताना गोगावले यांनी आगामी काळात विकासकामांवर भर देण्याचे स्पष्ट केले. “टीका करणाऱ्यांना कामाने उत्तर देऊ, विकासाने उत्तर देऊ,” हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विचार असून त्याच पद्धतीने रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार महेंद्रशेठ दळवी, शिवसेना उपनेते तथा माजी आमदार शहाजीबापू पाटील, भाजपाचे शरदभाऊ लाड, दीपकजी बेहेरे, राजेशजी भगत तसेच आरपीआयचे प्रमुख पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या नागरी सत्कार सोहळ्याची सांगता करण्यात आली.








