वंजारवाडी नदी पुलाच्या अलिकडे जीवघेणे खड्डे
एखादा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का? वाहनधारकांचा संतप्त सवाल
नरेश जाधव | कर्जत:
देश विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचा गवगवा केला जात असला, तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था पाहिल्यानंतर विकास नेमका कुठे पोहोचला, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. कर्जत तालुक्यातील वंजारवाडी गावाच्या पुढे नदी पुलाच्या अलिकडे मुख्य रस्त्यावर पडलेल्या महाभयंकर खड्ड्यांनी वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
या रस्त्यावर अक्षरशः जीवघेणे खड्डे पडले असून त्यातून वाहन चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली आणि आकार वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. परिणामी रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार किंवा चारचाकी चालकाचा वाहनावरील ताबा सुटून गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या आणि व्याप्ती पाहता वाहनचालकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. एकीकडे खड्डे चुकविण्याचा प्रयत्न केला तर समोरून येणाऱ्या वाहनाला धडकण्याचा धोका, तर दुसरीकडे खड्ड्यातून वाहन नेले तर वाहनाचे नुकसान होण्यासह अपघाताची शक्यता, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.
दुचाकीस्वारांसाठी तर हा मार्ग अधिकच धोकादायक ठरत आहे. पाण्याखाली लपलेला खड्डा अचानक समोर आल्यास दुचाकी घसरून चालक रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्ता की मृत्यूचा सापळा? असा प्रश्न वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
या खड्ड्यांमुळे वाहनांच्या टायर, रिम, सस्पेन्शनसह इतर भागांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाहनधारकांकडून करण्यात येत आहेत. रोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
सततच्या त्रासामुळे वाहनधारकांचा संयम आता सुटू लागला असून प्रशासनासह लोकप्रतिनिधींबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खड्ड्यांतून वाहन नेताना होणाऱ्या त्रासामुळे अनेक वाहनधारक संतापाच्या भरात प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना अक्षरशः शिव्यांची लाखोळी वाहताना दिसत आहेत.

जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?
“या रस्त्यावर एखादा मोठा अपघात होऊन एखाद्या निष्पाप वाहनधारकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होणार आहेत का?” असा संतप्त सवाल नागरिक आणि वाहनधारक उपस्थित करत आहेत.
अपघात होण्याची वाट पाहण्यापेक्षा त्यापूर्वीच खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करणे ही प्रशासनाची जबाबदारी नाही का? असा सवालही आता जोर धरू लागला आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून खड्डे बुजविणे, रस्त्याची डागडुजी करणे आणि पावसाळ्यात पाणी साचणार नाही यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यानंतर केवळ पंचनामा, आश्वासने आणि चौकशी करून उपयोग काय, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

प्रतिक्रिया:
प्रशासनाने आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी आता तरी गांभीर्याने दखल घ्यावी; अन्यथा “खड्डे बुजवा, जीव वाचवा” या मागणीसाठी नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येऊ शकते – जनार्दन नारायण पानमंद (गड संवर्धन प्रेमी), दिव्यांग वाहनधारक






