कर्जतचे ‘वाहतूक मित्र’ ठरले ‘जीवनदूत’
वाहतूक सुरळीत करण्यासाठी वर्षभर केलेल्या कार्याची मान्यवरांकडून दखल
पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मान
नरेश जाधव | कर्जत:
कर्जत शहर आणि परिसरात निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या ‘पोलीस वाहतूक मित्र’ समूहातील कार्यकर्त्यांचा त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘जीवनदूत’ म्हणून भव्य सन्मान करण्यात आला. सामाजिक बांधिलकी आणि समाजाचे देणे लागतो या भावनेतून गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या त्यांच्या कार्याची यावेळी दखल घेण्यात आली.

कर्जत शहरात वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि विविध कारणांमुळे वाहतूक समस्येने गंभीर स्वरूप धारण केले होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनावर येणारा अतिरिक्त ताण लक्षात घेऊन काही सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी एकत्र येत ‘पोलीस वाहतूक मित्र’ हा समूह तयार केला. या समूहाच्या माध्यमातून वाहतूक नियमन, वाहनचालकांना मार्गदर्शन, गर्दीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सहकार्य करण्याचे काम सातत्याने केले जात आहे.

गेल्या साधारण एक वर्षापासून पोलीस वाहतूक मित्रांच्या माध्यमातून हे सामाजिक कार्य सुरू आहे. पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत नागरिकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगणे, वाहतूक कोंडी झाल्यास ती सोडविण्यासाठी पोलिसांना सहकार्य करणे आणि अपघात किंवा आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी तत्पर राहणे, अशी विविध कामे या समूहातील सदस्यांकडून केली जात आहेत. त्यांच्या या कार्याला कर्जतकर नागरिकांचेही उत्तम सहकार्य मिळत आहे.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कुमार गोखले, प्रविण कालेकर (बाळा), अमिर मनियार, महेंद्र कर्वे, सतीश मुसळे, शिवनाथ कारखेले, जय मल्हार टोईंग व्हॅन व ॲम्ब्युलन्स सेवा तसेच विकास चित्ते यांचा ‘जीवनदूत’ म्हणून गौरव करण्यात आला.

हा भव्य सन्मान रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले, रायगडच्या जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगडच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, रायगडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण, हेड कॉन्स्टेबल रुपेश नागे, विशाल आव्हाड यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकीचे कौतुक
पोलीस वाहतूक मित्रांकडून कोणत्याही अपेक्षेशिवाय सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सुरू असलेले कार्य हे समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न केवळ पोलिसांचा नसून तो प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. त्यामुळे नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
दरम्यान, ‘पोलीस वाहतूक मित्र’ समूहाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या कार्याबद्दल कर्जतकरांकडून सदस्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या सामाजिक योगदानाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.








