खांडपे-कोंदिवडे रस्ता ‘जैसे थे’ ; प्रशासन व नेते गायब ?
व्हिडिओ व्हायरल होताच खड्डे बुजले, सत्कारांची रांग लागली ; मात्र काही दिवसांतच रस्त्याची पुन्हा चाळण
गणपती उत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास श्रीराम पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा
नरेश जाधव | कर्जत :
कर्जत तालुक्यातील खांडपे-कोंदिवडे रस्त्यावरील खड्ड्यांची दुरावस्था पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. काही काळापूर्वी या रस्त्यावरील खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या तीन शाळकरी मुलींनी मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून रस्त्याची वस्तुस्थिती सर्वांसमोर आणली होती. हा व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल झाल्यानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून तातडीने दखल घेण्यात आली होती. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले, मुलींचे कौतुक आणि सत्कारही झाले. मात्र, आज पुन्हा त्याच रस्त्याची अवस्था बिकट झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. “व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सगळे आले, पण आता रस्ता पुन्हा खड्डेमय झाल्यानंतर तेच नेते आणि अधिकारी कुठे आहेत ?” असा सवाल पोलीस मित्र संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
तीन चिमुकल्यांच्या व्हिडिओने हादरवले होते प्रशासन:
खांडपे-कोंदिवडे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शाळेत ये-जा करतांना होणाऱ्या त्रासाची व्यथा तीन शाळकरी मुलींनी स्वतःच ‘रिपोर्टर’ बनून मांडली होती. त्यांच्या व्हिडिओने सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण झाली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाची यंत्रणा सक्रिय झाली. संबंधित लोकप्रतिनिधींनीही दखल घेत रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती व खड्डे बुजविण्याची कामे केल्याचे सांगण्यात आले. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्या मुलींचे कौतुक केले आणि त्यांचा सत्कारही करण्यात आला. मात्र, आता पुन्हा या रस्त्यावर मोठमोठे खड्डे, चिखल आणि पावसाचे पाणी साचल्याने नागरिक व वाहनचालक त्रस्त झाल्याची परिस्थिती आहे.
पोलीस मित्र संघटनेचे समाजसेवक रमेश शांताराम कदम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार, खांडपे-कोंदिवडे रस्ता संबंधित जिल्हा परिषद गटाच्या हद्दीत येतो. हा परिसर घारे बंधूंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असल्याचे सांगत त्यांनी स्थानिक नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कर्जत पंचायत समितीच्या सभापती नमीताताई घारे यांच्या विभागातील रस्त्याची अशी अवस्था का झाली, असा सवालही नागरिकांकडून विचारला जात असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, “सत्ता, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असतानाही सर्वसामान्य नागरिकांना खड्डेमय रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असेल, तर या परिस्थितीला जबाबदार कोण ?”

कर्जत तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था
खांडपे-कोंदिवडे रस्त्यापुरतीच ही समस्या मर्यादित नसून कर्जत तालुक्यातील अनेक प्रमुख व ग्रामीण रस्त्यांची अवस्था खराब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पावसामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून, काही ठिकाणी चिखल व पाणी साचल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.
पोलीस मित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केल्याचा दावा केला असून, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदने देऊन तातडीने रस्तेदुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गणपती बाप्पाला घेऊन खड्ड्यात बसू :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा होत असल्याने खराब रस्त्यांमुळे दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीने कामे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलीस मित्र संघटनेने प्रशासनाला इशारा देतांना म्हटले आहे की, गणपती उत्सव सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची योग्य दुरुस्ती करण्यात आली नाही, तर आंदोलनाचा मार्ग स्विकारण्यात येईल.
याच पार्श्वभूमीवर सोमवार, दि. 7 सप्टेंबर रोजी श्रीराम पुलावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते व उपोषणकर्ते रमेश कदम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, संबंधित विभागांनी तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
कर्जत तालुक्यातील रस्त्यांच्या प्रश्नावरून राजकीय नेत्यांकडून होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांवरही पोलीस मित्र संघटनेने टीका केली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेले नेते एकमेकांवर आरोप करतात, आंदोलनाचे इशारे देतात. मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असेल, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची ? असा प्रश्न रमेश कदम यांनी उपस्थित केला आहे.

भ्रष्टाचार, अन्याय आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर केवळ राजकीय भूमिका न घेता प्रत्यक्ष कामे व्हावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
आम्ही वर्गणी, देणगी किंवा मते मागत नाही, जनतेचा पाठिंबा मागतो – रमेश कदम
पोलीस मित्र संघटनेचे समाजसेवक रमेश शांताराम कदम यांनी नागरिकांना आवाहन करतांना सांगितले की, संघटना कोणाकडे वर्गणी, देणगी किंवा मतांची मागणी करीत नाही. मात्र, जेव्हा नागरिकांच्या हक्कांसाठी, अन्याय-अत्याचार व कथित भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन किंवा उपोषण केले जाते, तेव्हा सर्वसामान्य नागरिकांनी पाठिंबा द्यावा.
खांडपे-कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न हा केवळ एका रस्त्याचा नसून कर्जत तालुक्यातील खराब रस्त्यांच्या व्यापक समस्येचे प्रतीक बनला आहे. तीन शाळकरी मुलींनी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली परिस्थिती काही काळापुरती बदलली. मात्र, रस्ता पुन्हा खड्डेमय झाल्याने कायमस्वरूपी आणि दर्जेदार उपाययोजनांची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
आता संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या प्रश्नाची कायमस्वरूपी दखल घेऊन खड्डेमुक्त, सुरक्षित आणि दर्जेदार रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देणार का ? याकडे कर्जतकर जनतेचे लक्ष लागले आहे.







