कर्जत-खालापूर मतदारसंघातील प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा
प्रथमेश कुडेकर | कर्जत:
कर्जत-खालापूर मतदारसंघातील औद्योगिक शांतता, स्थानिक युवकांच्या रोजगाराच्या संधी आणि परिसराच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी औद्योगिक क्षेत्रातील सद्यस्थिती तसेच स्थानिक नागरिकांच्या मागण्या आणि रोजगाराशी संबंधित प्रश्नांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.
कर्जत-खालापूर परिसरात टाटा स्टील आणि गोदरेज अँड बॉयस कंपनीच्या संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक वातावरण शांततापूर्ण आणि सुरळीत राहणे आवश्यक असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. उद्योगांमुळे परिसरातील आर्थिक विकासाला चालना मिळत असून, त्याचबरोबर स्थानिक तरुणांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे उद्योग आणि स्थानिक नागरिक यांच्यात समन्वय राहून सर्वमान्य तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले.
औद्योगिक प्रकल्पांमुळे स्थानिकांना रोजगार, व्यवसायाच्या संधी आणि परिसराच्या विकासाचा थेट लाभ मिळावा, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे. त्यामुळे उद्योगांचे हित आणि स्थानिक नागरिकांचे हक्क यांचा समतोल साधत प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक भूमिका घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, या विषयासंदर्भात मंत्रालय किंवा वरिष्ठ प्रशासकीय स्तरावर भविष्यात कोणतीही समन्वय बैठक आयोजित करण्यात आल्यास स्थानिक परिस्थिती आणि वस्तुस्थिती प्रभावीपणे मांडण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात यावे, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
विशेषतः रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. भरतशेठ गोगावले साहेब तसेच संबंधित लोकप्रतिनिधींना अशा बैठकीत सहभागी करून घेण्यात यावे, जेणेकरून स्थानिक पातळीवरील समस्या, नागरिकांच्या भावना आणि रोजगाराशी संबंधित वास्तव शासनासमोर मांडता येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
कर्जत-खालापूर मतदारसंघातील औद्योगिक विकास हा स्थानिकांच्या हितासोबतच पुढे जावा आणि औद्योगिक शांतता कायम राहावी, यासाठी शासन, प्रशासन, उद्योग व्यवस्थापन आणि स्थानिक नागरिक यांच्यात समन्वयाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसोबत झालेली ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.







