दिव्यांग अनंता कुटुंबासह झोपडीतच… पक्क्या घराच्या प्रतीक्षेत चार वर्षे
दीपक बोराडे | नेरळ:
कळंब ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या भागूचीवाडी या दुर्गम आदिवासी वस्तीत अनंता लक्ष्मण ढोले हे आपल्या कुटुंबासह गेल्या जवळपास चार वर्षांपासून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. शिक्षण असूनही रोजगाराचे कोणतेही साधन नसलेल्या अन्नता यांच्यावर दिव्यांगत्वामुळे मेहनत-मजुरी करण्याचीही मर्यादा आली आहे. अशा परिस्थितीत पत्नी मजुरी करून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून, दोन लहान मुलांसह हे कुटुंब आजही एका साध्या झोपडीत दिवस कंठत आहे.
भागूचीवाडी हा डोंगर-दऱ्या आणि घनदाट जंगल परिसरात वसलेला दुर्गम आदिवासी भाग आहे. या परिसरात अन्नता यांची झोपडी असल्याने पावसाळ्यात त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती आणखी बिकट होते. झोपडीला भक्कम भिंती नाहीत, सुरक्षित छप्पर नाही आणि नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणाची कोणतीही ठोस व्यवस्था नाही. रात्रीच्या वेळी साप, विंचू तसेच इतर वन्यजीवांचा धोका कायमच असतो. या भीतीच्या सावटाखाली दोन लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबाला राहावे लागत आहे.
अन्नता हे शिक्षित आहेत. मात्र दिव्यांगत्वामुळे त्यांना नियमित मेहनतीचे काम किंवा मजुरी करणे शक्य होत नाही. रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी त्यांच्या पत्नी मजुरी करतात. मिळेल ते काम करून त्या संसाराचा भार उचलत आहेत. मात्र तुटपुंज्या मजुरीतून घरखर्च, मुलांचे शिक्षण, अन्नधान्य आणि इतर गरजा भागवताना त्यांची अक्षरशः कसरत होत आहे.
गेल्या जवळपास चार वर्षांपासून हे कुटुंब झोपडीत राहत असतानाही अद्याप त्यांना ग्रामपंचायतीमार्फत घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नसल्याचे सांगण्यात येते. शासनाच्या विविध घरकुल योजना गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना सुरक्षित निवारा देण्यासाठी आहेत. मात्र अन्नता यांच्या कुटुंबाला अद्याप या योजनांचा लाभ मिळालेला नाही.
दिव्यांग व्यक्ती, लहान मुले आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणारे हे कुटुंब सुरक्षित घराच्या प्रतीक्षेत आहे. पावसाच्या सरी झोपडीवर कोसळत असताना घराच्या चार भिंतींचे स्वप्न पाहणाऱ्या या कुटुंबाच्या डोळ्यांतील आशा आता प्रशासनाच्या मदतीकडे लागल्या आहेत.
आपल्या मुलांना सुरक्षित वातावरणात वाढवावे, त्यांना चांगले शिक्षण मिळावे आणि कुटुंबाला डोक्यावर सुरक्षित छप्पर मिळावे, एवढीच अन्नता यांच्या कुटुंबाची अपेक्षा आहे. मात्र परिस्थितीपुढे हतबल झालेल्या या कुटुंबाला स्वतःच्या हक्काचे घर उभे करणे शक्य होत नाही.
त्यामुळे अन्नता लक्ष्मण ढोले यांच्या कुटुंबाची वस्तुस्थिती प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना पात्रतेनुसार शासकीय घरकुल योजनेचा लाभ तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे. संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाने या प्रकरणाकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अन्नता यांच्या कुटुंबाची परिस्थिती केवळ एका घराची गरज नसून, दुर्गम आदिवासी भागातील वंचित कुटुंबांसमोर असलेल्या प्रश्नांचेही वास्तव चित्र आहे. त्यामुळे प्रशासनासोबतच सामाजिक संस्था, सेवाभावी संघटना आणि दानशूर व्यक्तींनी या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
दिव्यांग पती, मजुरी करणारी पत्नी आणि दोन लहान मुले… डोक्यावर सुरक्षित छप्पर नसताना जंगलाच्या सान्निध्यात जगणाऱ्या या कुटुंबाला आता केवळ आश्वासन नव्हे, तर मदतीची गरज आहे. चार वर्षांची प्रतीक्षा संपवून अन्नता यांच्या कुटुंबाला पक्क्या घराचे छप्पर कधी मिळणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.








