रस्ते खड्डेमुक्त होईपर्यंत माघार नाही!
‘टक्केवारी’मुळे रस्त्यांच्या कामाचा दर्जा कसा राखणार? रमेश कदमांचा प्रशासनाला थेट सवाल
गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवा, अन्यथा आंदोलन तीव्र करणार
नरेश जाधव / कर्जत :
सोमवार दि, 7 सप्टेंबर 2026 रोजी कर्जत शहरातील श्रीराम पूल येथे बाप्पाला मांडीवर घेऊन पोलिस मित्र संघटनेचे तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी उपोषण आणि आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्जत परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्क गणपती बाप्पाची मूर्ती सोबत घेऊन आगळेवेगळे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याने नागरिक, वाहनचालक तसेच गणेशभक्तांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला असून, गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
“गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे सुस्थितीत भरावेत. केवळ वरवरची मलमपट्टी करून नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करू नये,” अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. रस्त्यांची कायमस्वरूपी डागडुजी होऊन रस्ते खड्डेमुक्त झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“रस्त्याच्या कामात ‘टक्केवारी’चा खेळ होत असेल, तर कामाचा दर्जा कसा राखला जाणार? जनतेच्या पैशातून होणाऱ्या कामाचा दर्जा चांगला असणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असा सवाल त्यांनी केला.
दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात आणि त्यानंतर खड्डे बुजविण्याच्या नावाखाली लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, काही दिवसांतच पुन्हा रस्त्यांची अवस्था जैसे थे होत असल्याने कामाच्या गुणवत्तेची तपासणी आणि संबंधित ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
गणेशोत्सव हा सर्वसामान्यांच्या भावनेशी जोडलेला उत्सव आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनापूर्वी कर्जत परिसरातील रस्ते सुरक्षित आणि खड्डेमुक्त करावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
आता प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने उपाययोजना करणार का, की यंदाही खड्ड्यांवर केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.







