शारदा मंदिर शाळेत चित्रकला व रंगभरण कार्यशाळा
‘माय बाप्पा फेस्टिवल’ने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला दिले व्यासपीठ
रायगडचे वादळ न्यूज नेटवर्क | कर्जत:
गणेशोत्सवाच्या उत्साहाला विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेची जोड देत कर्जत येथील शारदा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी नवनीत प्रकाशन यांच्या वतीने ‘माय बाप्पा फेस्टिवल’ या उपक्रमांतर्गत चित्रकला व रंगभरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

इयत्ता चौथी ते सहावीतील विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध चित्रे साकारत रंगभरणाचा मनमुराद आनंद लुटला. गणपती बाप्पाच्या उत्सवाचे वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची सांगड घालत कार्यशाळेत अनेक सुंदर आणि आकर्षक चित्रे विद्यार्थ्यांनी साकारली.
या कार्यशाळेसाठी चित्रकला विषयाचे मार्गदर्शक भरत पारडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चित्र काढण्याच्या सहज, सोप्या आणि प्रभावी पद्धती, योग्य रंगसंगती, चित्रामध्ये कल्पकतेचा वापर तसेच चित्र अधिक आकर्षक कसे करता येईल, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. केवळ तोंडी मार्गदर्शन न करता त्यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष चित्रे काढून दाखवत विविध बारकावे समजावून सांगितले.

भरत सरांचे मार्गदर्शन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनाशक्तीचा वापर करून चित्रे काढली व त्यामध्ये विविध रंगांची आकर्षक उधळण केली. त्यामुळे संपूर्ण कार्यशाळेत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नगरकर मॅडम, सहकारी शिक्षक तसेच नवनीत प्रकाशनतर्फे भरत सरांचे सहकारी ध्रुव, सचिन शेतवे आणि कैलास जाधव उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले.

कार्यशाळेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवनीत प्रकाशन यांच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांना चित्रकलेचे साहित्य असलेले विशेष किट देण्यात आले. या किटमुळे विद्यार्थ्यांना कार्यशाळेनंतरही चित्रकलेचा सराव करता येणार असून, त्यांच्या कलागुणांना अधिक वाव मिळणार आहे.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना नवनीत प्रकाशनतर्फे सहभागाचे प्रमाणपत्र आणि गोड खाऊ देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून आले.

‘माय बाप्पा फेस्टिवल’ हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक दृष्टी, सर्जनशील विचार, कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वास विकसित करण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरला. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमांची गरज असून, या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या सुप्त कलागुणांना व्यक्त करण्यासाठी एक सुंदर व्यासपीठ मिळाले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नवनीत प्रकाशनचा उपक्रम यामुळे शारदा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमधील ‘माय बाप्पा फेस्टिवल’ अंतर्गत आयोजित चित्रकला व रंगभरण कार्यशाळा आनंददायी आणि संस्मरणीय ठरली.







