दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी, आदिवासी शाळांपासून महिलांच्या आरोग्यापर्यंत निःस्वार्थ सेवेला राष्ट्रीय स्तरावर दाद
मोतीराम पादीर | कर्जत:
गेली अनेक वर्षे कोणताही गाजावाजा न करता शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात निःस्वार्थपणे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद विरले यांना नवी दिल्ली येथील अँटी करप्शन बोर्डतर्फे प्रतिष्ठेचा “महाराष्ट्र गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला.नेरळ कोल्ह्यारे येथे हजारोच्या उपस्थित हा सोहळा उत्साहात पार पडला.
देशभरातील सामाजिक कार्याचा आढावा घेत हा सन्मान विरले यांचा करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यात बोर्डचे अध्यक्ष आर. के. जैन, कर्जत डीवायएसपी राहुल गायकवाड, राष्ट्रीय उपाध्यक्ष खैरनार, जिल्हा पदाधिकारी भरत राणे, रामदास माळी, काशिनाथ धुळे यांच्यासह विविध राज्यांतून आलेले मान्यवर उपस्थित होते.
मिलिंद विरले यांनी आजवर २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना वर्षभर लागणारे साहित्य, शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव, दहावी-बारावी गुणवंतांचा सत्कार, शालेय सहली आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी चित्रपट दाखवण्यासारखे अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत.
याशिवाय आदिवासी वाड्यांतील शाळांना साहित्य वाटप, शाळांची स्वखर्चाने रंगरंगोटी, तसेच अनेक मुलींच्या शिक्षणासाठी पालकत्व स्वीकारून त्यांचा शैक्षणिक खर्च उचलण्याचे कार्यही त्यांनी सातत्याने केले आहे.
महिलांच्या आरोग्याच्या समस्या जाणून त्यांना रुग्णालयापर्यंत नेणे, गरज पडल्यास स्वखर्चाने उपचार करणे आणि दुर्लक्षित कुटुंबांना आधार देणे हेही विरले यांच्या सामाजिक कार्याचे महत्त्वाचे अंग आहे.
“मी कधीच पुरस्कार किंवा प्रसिद्धीची अपेक्षा ठेवून काम केले नाही. आज माझ्या कार्याची दखल घेतली गेली, हा खरा सन्मान आहे. पुढेही समाजासाठी माझे काम अविरत सुरू राहील.”
निःस्वार्थ सेवेला मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान कर्जत तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.








