क्रीडा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव
नरेश जाधव | कर्जत:
मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कर्जत एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल, कर्जत येथे राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयी आवड निर्माण व्हावी, शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व समजावे तसेच खेळातून संघभावना, शिस्त आणि आत्मविश्वास विकसित व्हावा, या उद्देशाने विविध मैदानी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला हॉकीचे महान खेळाडू व भारताचे ‘हॉकीचे जादूगार’ म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी प्रविण गांगल, कमिटी मेंबर सतीश शेठ पिंपरे, मुख्याध्यापिका सौ. अनुपमा चौधरी यांच्यासह शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.
सतीश शेठ पिंपरे यांच्या हस्ते नारळ वाढवून क्रीडा स्पर्धांना औपचारिक सुरुवात करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. कबड्डी, खो-खो तसेच विविध मैदानी खेळांच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडा कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. एकमेकांना प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याने शाळेच्या परिसरात चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सेक्रेटरी प्रविण गांगल आणि मुख्याध्यापिका सौ. अनुपमा चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाचे असलेले महत्त्व आपल्या भाषणातून स्पष्ट केले. शिक्षणासोबतच खेळालाही जीवनात महत्त्वाचे स्थान असून, नियमित खेळामुळे शरीर निरोगी राहण्याबरोबरच मानसिक विकास, आत्मविश्वास, शिस्त, नेतृत्वगुण आणि संघभावना वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास शिक्षक सुनील बोरसे, रविंद्र राऊत, एलन सर तसेच शिक्षिका नगमा नझे, प्रिती म्हात्रे, कविता पाटील, रमा जोशी, मानसी पाटील, शुभदा टीचर आणि प्रज्ञा पालकर यांची उपस्थिती होती. शिक्षकांनी स्पर्धांचे नियोजन व आयोजन करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या क्रीडा कौशल्याला वाव देण्याची संधी मिळाली. खेळ, शिक्षण आणि आरोग्य यांचा सुंदर संगम घडवत कर्जत एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.








