विभागीय स्पर्धेत करणार रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व
क्रीडा मार्गदर्शक सुनील गुढेकर यांचाही सन्मान
दीपक कारकर | कोकण:
दापोली तालुक्यातील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, मांदिवली विद्यालयाची यशस्वी क्रीडापटू कु. जान्हवी रवींद्र हुमणे हिने जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत उंच उडी या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल विद्यालयात तिचा जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच आगामी विभागीय स्पर्धेत ती रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने डेरवण येथे आयोजित जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत जान्हवीने हे यश मिळवले. तिच्या या कामगिरीमुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एका मानाचा तुरा रोवला गेला आहे.

केळशी जिल्हा परिषद गटाचे सदस्य नितीनदादा दुर्गवले यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना, केळशी जिल्हा परिषद गटाच्या वतीने हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगेश कोकीळ यांनी विद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच मागील पाच वर्षांत विद्यालयाने क्रीडा क्षेत्रात मिळवलेल्या उल्लेखनीय यशाची माहिती दिली.
यावेळी केळशी जिल्हा परिषद गटाचे सदस्य नितीनदादा दुर्गवले आणि पंचायत समिती सदस्य संदीप चिखले यांच्या हस्ते जान्हवीचा सत्कार करण्यात आला. नितीनदादा दुर्गवले यांच्याकडून तिला क्रीडा साहित्य भेट देण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी तिला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
जान्हवीला स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुनील गुढेकर यांचाही विद्यार्थ्यांनी विविध स्तरांवर मिळवलेल्या यशाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय जिल्हास्तरीय स्पर्धेत ४०० मीटर अडथळा शर्यतीत तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या कु. दिया भुवड हिचेही अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना नितीनदादा दुर्गवले यांनी विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आपल्या जीवनातील ध्येय पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले. तर संदीप चिखले यांनी परिस्थितीमुळे कोणीही खचून न जाता पुढे जात राहावे. विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही दिली.
मांदिवली गावचे सरपंच चंद्रशेखर वेदपाठक यांनी ग्रामपंचायत विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा नेहमीच प्रयत्न करेल, असे सांगितले. विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा गीतांजलीताई वेदपाठक यांनी विद्यालय कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत सातत्याने प्रगती करत असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा गीतांजलीताई वेदपाठक होत्या. यावेळी केळशी जिल्हा परिषद गटाचे सदस्य नितीनदादा दुर्गवले, पंचायत समिती सदस्य संदीप चिखले, मांदिवलीचे सरपंच चंद्रशेखर वेदपाठक, रोवले-आंबवलीचे सरपंच विष्णू वजीरकर, आडेचे सरपंच सोमनाथ कुलाबकर, निलेश तांबे, प्रतिभा चिंचघरकर, वांझळोलीच्या माजी सरपंच निधी दुर्गवले, गणेश गावणुक, कमलेश जाधव, राजूशेठ महाजन, शिवसेना केळशी जिल्हा परिषद गटाचे सोशल मीडिया प्रमुख युवराज पावशे, सुलोचना पवार, आरती हुमणे, रवींद्र हुमणे, रसिका हुमणे, चांडवकर यांच्यासह विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगेश कोकीळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक सुनील गुढेकर यांनी केले.
जान्हवीच्या या यशामुळे मांदिवली विद्यालयाचा नावलौकिक वाढला असून, विभागीय स्पर्धेतही ती उत्तुंग यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.






